Abu Dhabi’s BAPS Mandir : अबुधाबीतील स्वामीनारायण मंदिरात पहिल्या रविवारी तब्बल ६५ सहस्र लोकांनी घेतले दर्शन !
१ मार्चपासून सर्वांसाठी उघडले मंदिर !
अबुधाबी (संयुक्त अरब अमिरात) – येथे गेल्याच महिन्यात उद्घाटन झालेले स्वामीनारायण मंदिर १ मार्च या दिवशी सर्वांसाठी खुले करण्यात आले. हे मंदिर सर्वांसाठी उघडल्यानंतर पहिल्या रविवारी, म्हणजे ३ मार्चला तब्बल ६५ सहस्र लोकांनी मंदिरात भावपूर्ण दर्शन घेतले. एका मुसलमान देशात एवढ्या मोठ्या संख्येने एका हिंदु मंदिरात दर्शन देण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असेल. या प्रसंगी दर्शनार्थिंनी मंदिराच्या व्यवस्थापनासाठी तेथील स्वयंसेवक आणि मंदिर कर्मचारी यांचे कौतुक केले अन् आनंद व्यक्त केला. प्रचंड गर्दी असूनही भाविक धक्काबुक्की न करता संयमाने रांगेत उभे राहिले.
BAPS Hindu Mandir Abu Dhabi: Grand Public Opening Draws 65,000+ Pilgrims & Visitors#BAPSHinduMandir #hindutemples #hindutempleinuae #abudhabimandir https://t.co/V7s0gLmoLq
— Oneindia News (@Oneindia) March 4, 2024
अबूधाबी येथील सुमंत राय यांनी स्थानिक वर्तमानपत्र ‘खलीज टाईम्स’ला सांगितले की, सहस्रो लोकांमध्ये अशी अप्रतिम शिस्त मी कधीच पाहिली नाही. मला भीती वाटत होती की, मला तासन्तास वाट पहावी लागेल आणि शांततेत दर्शन घेता येणार नाही; पण आम्ही शांतपणे दर्शन घेतले अन् अत्यंत समाधानी झालो.