इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पांतर्गत कुदळवाडी (पिंपरी) येथे ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ कार्यान्वित !
प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर पाणी स्वच्छ होणार !
पिंपरी (जिल्हा पुणे) – इंद्रायणी नदीतील प्रदूषणावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडून कुदळवाडी येथे प्रतिदिन ३ दशलक्ष लिटर क्षमतेचा ‘सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प’ (ई.टी.पी.) कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे नदीमध्ये मिसळणारे रासायनिक आणि मलयुक्त दूषित पाणी रोखण्यास साहाय्य होणार आहे. ‘राष्ट्रीय हरित न्यायालय’ आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’ने दिलेल्या निर्देशानुसार महापालिकेने उपक्रम हाती घेतले आहेत. ‘नॅशनल रिव्हर कॉन्झर्वेशन डायरेक्टरेट’ने प्रकाशित केलेल्या अहवालामध्ये ‘इंद्रायणी नदी’च्या प्रदूषण पातळीविषयी चिंता व्यक्त केली होती. (इंद्रायणी नदीतील पाणी एवढे प्रदूषित होईपर्यंत महापालिका प्रशासन काय करत होते ? दूषित पाणी सोडणार्यांवर यापूर्वीच कडक कारवाई का केली नाही ? असा प्रश्न निर्माण होतो ! – संपादक)
या प्रकल्पांच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी बांधकाम व्यावसायिक, नागरिकांना विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रक्रिया केलेले पाणी टँकरमध्ये भरण्याची सुविधा सिद्ध केली आहे. अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे म्हणाले की, नदी प्रदूषणाचा सामना करण्यासाठी ‘सांडपाणी प्रकिया प्रकल्पा’ची यशस्वी कार्यवाही हा महत्त्वाचा टप्पा आहे. पवना नदीवरील एका नाल्यावरही असाच प्रकल्प उभारण्यात येईल. त्याचे काम नदीसुधार प्रकल्पांतर्गत केले जाणार आहे. (उशिराने सुचलेले शहाणपण, असे म्हणावे लागेल ! – संपादक)