उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी देणारा सातारा येथून कह्यात !
७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी; समाजात तेढ निर्माण करण्याचा होता प्रयत्न !
मुंबई – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिवे मारण्याची धमकी देणार्या मुख्य आरोपीला सातारा येथील सदर बझार येथून २ मार्च या दिवशी अटक केली. किंचक नवले असे या आरोपीचे नाव असून त्याला ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याने एका व्हिडिओच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजात तेढ निर्माण होईल, अशा भाषेत टीका केली होती, तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली होती. या प्रकरणी किंचक नवले याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला होता. सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या साहाय्याने सांताक्रूझ पोलिसांनी ही कारवाई केली.
व्हिडिओ स्त्रोत: न्यूज 18 Lokmat
या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी योगेश सावंत यानेही हा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याविषयी त्यालाही अटक करण्यात आली आहे. तेव्हापासूनच पोलीस मुख्य आरोपीच्या शोधात होते; मात्र किंचक नवले हा वेशांतर करून वेगवेगळ्या ठिकाणी रहात होता. त्यामुळे तो पोलिसांच्या कह्यात येत नव्हता. या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद उमटले होते. भाजपच्या वतीने योगेश सावंत याला अटक करण्याची मागणी करण्यात आली होती, तसेच शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार हे आरोपीला सोडवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोपही विधीमंडळात करण्यात आला होता; मात्र ‘तो माझा कार्यकता असून त्याने केवळ व्हिडिओ शेअर केला होता’, अशा शब्दांत आमदार रोहित पवार यांनी योगेश सावंत याची बाजू घेतली होती.