‘गुरुकृपा आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांमुळे ‘ब्रेन ट्यूमर’ या आजारावर यशस्वी मात केलेल्या पनवेल येथील श्रीमती अनुराधा मुळ्ये (वय ६३ वर्षे) !
१. ‘ब्रेन ट्यूमर’ (मेंदूत गाठ होणे) या आजारावर पुष्कळ औषधे घेऊनही काहीच गुण न आल्याने नैराश्य येऊन ‘आयुष्य संपत आले आहे’, असे वाटणे
‘मला २ वर्षांपूर्वी ‘ब्रेन ट्यूमर’ (मेंदूत गाठ होणे) हा आजार झाला होता. त्या आजारासाठी मी पुष्कळ औषधे घेतली. मी पंचगव्य चिकित्साही केली. तेव्हा मी वेगवेगळे काढे आणि चूर्ण घेतले. मी दिवसातून १० वेळा औषधे घेत असे. मला ही सर्व औषधे दिवसभर घेऊन पुष्कळ कंटाळा आला होता. मी ही सर्व औषधे ९ मास घेतली, तरी मला जेवढा लाभ व्हायला हवा, तेवढा झाला नाही. नंतर मी आयुर्वेदिय औषधोपचार चालू केले; पण मला परिणाम जाणवत नव्हता. मला ‘चालतांना तोल जाणे, चक्कर येणे आणि प्रचंड थकवा जाणवणे’, हे त्रास होतच होते. मी उठून पटलावरची एखादी वस्तूही घेऊ शकत नव्हते. मी स्वतःचे जेवणही वाढून घेऊ शकत नव्हते. मला इतका थकवा असल्यामुळे नैराश्य आले होते. मला ‘आयुष्य संपत आले आहे’, असे वाटत असे.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे सकारात्मकता वाढणे
पू. (सौ.) अश्विनी पवार यांनी मला होणार्या त्रासांवर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले.
२ अ. सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले प्रतिदिन करायचे नामजपादी उपाय
१. ‘ॐ’ हा नामजप २ घंटे करणे.
२. ‘निर्गुण’ हा नामजप २ घंटे करणे.
३. मेंदूला लागून गाठ असणे : ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय – श्री हनुमते नमः – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप १ घंटा करणे.
४. कोलेस्ट्रॉल’ न्यून होण्यासाठी : ‘श्री गुरुदेव दत्त – श्री राम जय राम जय जय राम – श्री हनुमते नमः – ॐ नमः शिवाय – ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप १ घंटा करणे.
मी जसा नामजप करू लागले, तशी माझ्यात सकारात्मकता वाढली.
३. साधकांच्या माध्यमातून उपचारासाठी साहाय्य मिळणे
श्री. विवेक नाफडे यांनी श्री. पुष्कराजला (जावयाला) चिंचवड येथील होमिओपॅथी डॉक्टरांचा पत्ता दिला. त्यांनी पुष्कराजला सांगितले, ‘‘मुळ्येकाकूंना आणि तुझ्या बाबांना तिकडे घेऊन जा.’’ आम्ही (पुष्कराज, पुष्कराजचे बाबा, मी आणि मयुरेश (मुलगा)) चिंचवड येथे गेलो. तेथे माझ्यावर उपचार चालू झाले. मला त्या उपचारांनी थोडे बरे वाटले; परंतु मला पुन्हा थकवा जाणवायला लागला.
आम्ही त्या होमिओपॅथी डॉक्टरांची पुन्हा भेट घेतली. ते म्हणाले, ‘‘एक ‘कार्टाेग्राफी’ (रक्त आणि प्राणवायू यांचे हृदयांच्या स्नायूंना होणार्या पुरवठ्याचे मापन) नावाची तपासणी करून घेऊया.’’ त्या तपासणीत ‘माझ्या हृदयाला ५० टक्केच रक्तपुरवठा होत आहे. त्यामुळे थकवा जाणवत आहे’, असे आढळले. त्या होमिओपॅथी डॉक्टरांनी सांगितले, ‘‘तेथे १५ दिवस तरी नवीन उपचार ‘ईईसीपी’ (हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा वाढण्यासाठी हृदयाच्या प्रत्येक आकुंचन-प्रसारण या क्रियांच्या विशिष्ट वेळी पायांच्या रक्तवाहिन्यांवर दाब देण्याची उपचारपद्धती) घ्यावे लागतील.’’ त्याप्रमाणे मी ती उपचारपद्धती चालू केली. त्यानंतर २ – ४ दिवसांतच ‘माझा थकवा न्यून होत आहे’, असे मला जाणवले; म्हणून मी ती उपचारपद्धती चालू ठेवली.
४. कुटुंबियांच्या माध्यमातून मिळालेल्या साहाय्यासाठी कृतज्ञता वाटणे
चिंचवड येथील रुग्णालयात मी आणि पुष्कराजचे बाबा भरती झालो होतो. तेव्हा पुष्कराजने माझी आणि त्याच्या बाबांची पुष्कळ सेवा केली. पुष्कराज आणि मयुरेश यांनी माझी पुष्कळ सेवा केली. माझ्या सुनेनेही (सौ. वेदिकाने) मला वेळच्या वेळी अल्पाहार आणि जेवण देणे इत्यादी सेवा केली. मी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करते.
५. नातवाच्या मुजींचे निमंत्रण सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना देणे आणि त्यांनी भेटवस्तू पाठवणे
मी चिंचवड येथून घरी परत आल्यावर माझ्या नातवाची (अथर्वची) मुंज करायचे ठरले. मी रुग्णाईत असल्याने मला थोडा ताण आला होता, तरी मला वाटत होते, ‘देवाची इच्छा असेल, तसे घडेल.’ आम्ही (मी आणि वेदिका) श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सूक्ष्मातून अथर्वच्या मुंजीचे निमंत्रण दिले. आम्हाला वाटले, ‘ते त्यांना मिळाले.’ त्यांनी अथर्वच्या मुंजीच्या १५ दिवस आधी मला बाळकृष्णाचे आसन, कपडे आणि त्याला घालायचे अलंकार भेट म्हणून पाठवले. ते पाहूनच माझा आणि सुनेचा भाव जागृत झाला अन् आम्हाला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
६. गुरुकृपेमुळे प्रकृतीत सुधारणा होणे
अथर्वची मुंज व्यवस्थित पार पडली. तेव्हापासून ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांची कृपा अन् सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय’ यांमुळे माझ्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. त्यांच्यामुळेच मला पुनर्जन्म मिळाला आहे. मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
७. घरी चालू झालेल्या सत्संगाचा पुष्कळ लाभ होणे आणि प्रकृतीत सुधारणा झाल्याने प्रतिदिन २ घंटे सेवा करता येणे
आमच्या उत्तरदायी साधिका सौ. सुनीता निमकर आमच्या घरी येऊन म्हणाल्या, ‘‘सत्संग घेण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. तुमच्याकडे सत्संग घेऊ शकतो का ?’’ मी लगेच ‘हो’ म्हटले. आमच्या घरात सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणार; म्हणून मला पुष्कळ आनंद झाला. मला सत्संगाची सिद्धता करायला जमत नसे. मी श्रीकृष्णाला ‘तूच साहाय्य कर’, असे सांगत असे. मी श्रीकृष्णाचे चित्र पटलावर ठेवून त्याची पूजा करत असे. मला या सत्संगाचा पुष्कळ लाभ झाला. माझी प्रकृती आता पुष्कळच चांगली आहे. मी घरात राहून प्रतिदिन २ घंटे धान्य निवडण्याची सेवा करते आणि घरी स्वयंपाक करण्यातही साहाय्य करू शकते. आता मी पुष्कळ आनंदी आहे.
८. प्रार्थना आणि कृतज्ञता
हे सर्व गुरुदेवांच्या कृपेमुळेच शक्य झाले. ‘माझे उर्वरित जीवन सेवेत व्यतीत व्हावे’, अशी मी श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना करते. मी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती अनुराधा मुळ्ये (आध्यात्मिक पातळी ६० टक्के, वय ६३ वर्षे), पनवेल, जि. रायगड. (३.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |