संपादकीय : अमेरिकेत भारतीय असुरक्षित !
अमेरिकेत भरतनाट्यम् नर्तक अमरनाथ घोष यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. अद्याप या घटनेला भारताच्या मुख्य प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळालेली नाही, ना सामाजिक माध्यमांमध्ये ही बातमी प्रसारित झाली. केवळ काही राष्ट्र आणि धर्म प्रेमी यांनी याविषयी सामाजिक माध्यमांमध्ये आवाज उठवला. अमरनाथ हे भरतनाट्यम् आणि कुचिपुडी नृत्य करायचे अन् सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापिठातून नृत्यात ‘मास्टर ऑफ फाईन आर्ट्स’मध्ये ‘पीएच्.डी.’चे शिक्षण घेत होते. ते फिरायला गेले असतांना त्यांची गोळीबार करून हत्या करण्यात आली. गेल्याच मासात काही भारतीय विद्यार्थ्यांच्या हत्या अमेरिकेत करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही शृंखला चालूच आहे, असे लक्षात येते.
भारतीय विषयांसाठी विदेशात शिक्षण का ?
भारतीय विद्यार्थी मोठ्या संख्येत विदेशात शिक्षणासाठी जात आहेत. अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. अमेरिका आणि इंग्लंड येथे उच्च शिक्षण घेणे, हे प्रतिष्ठेचे समजले जाते. तेथील शिक्षण आणि त्यानंतर रोजगाराच्या अनेक संधी अन् विविध सुविधा यांची भारतीय विद्यार्थ्यांना भुरळ पडली आहे. भारतातील एकूणच यंत्रणा, नोकरी आणि शिक्षण यांच्या संधी यांच्या तुलनेत विदेशातील व्यवस्था अन् तेथे ‘टॅलेंट’ला मिळणारे अनुकूल वातावरण यांमुळे तेथे जाण्याकडे कल आहे. त्यानंतर तर सहकुटुंब तेथेच स्थायिक होण्याकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असतो. हे भारतातील प्रशासकीय यंत्रणा आणि भारतीय विद्यापिठांतील शिक्षणाचा दर्जा यांच्यासाठी लज्जास्पदच आहे. आता अमरनाथ यांचाच विचार केला, तर भरतनाट्यम्, कथ्थक, कुचिपुडी इत्यादी नृत्यप्रकार पूर्णपणे भारतातच विकसित आणि भरभराटीला आले आहेत. भारत त्यांची जननी आहे; मात्र त्या विषयांमध्ये ‘डॉक्टरेट’ मिळवण्यासाठी अमेरिकेत जावे लागणे, हे किती आश्चर्यकारक आहे ? म्हणजे भारत जे विषय, कला यांची जननी आहे, त्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात जावे लागणे, हे कुणाचे अपयश आहे ? व्यवस्थेचे ? येथील त्या त्या विषयांतील तज्ञांचे कि सरकारचे ? हिंदु धर्मातच १४ विद्या आणि ६४ कला यांचा उल्लेख येतो. या विद्या आणि कला खरेतर दैवी आहेत, म्हणजे हिंदूंच्या साधनेचा अविभाज्य भाग आहेत. गुरुगृही राहून साधना करत त्या आत्मसात् करायच्या असतात, जेणेकरून मनुष्यजीवनाचे मूळ ध्येय मोक्षप्राप्ती हे संबंधित कलाकाराला या माध्यमातून साध्य होऊ शकते. या कलांचे दर्जेदार शिक्षण भारतीय विद्यापिठांतून उपलब्ध करून देणे, हे सरकार आणि या कलांचे तज्ञ यांचेही सामायिक दायित्व आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांवर त्यासाठी विदेशात जाण्याची वेळ येणार नाही. यामध्ये कुठे अडचणी आणि त्रुटी रहात आहेत ? हे पाहिले पाहिजे.
भारतातही शिक्षण आणि नोकरी यांच्या संधी
२ मासांपूर्वी ‘इस्रायलमध्ये १ लाख प्रशिक्षित भारतीय कामगारांची आवश्यकता आहे’, अशी; तर आता ‘जर्मनीला ४ लाख प्रशिक्षित भारतीय विद्यार्थी त्यांच्या आस्थापनांमध्ये हवे आहेत’, अशी बातमी आहे, म्हणजे भारतीय गुणवत्तेला आता विदेशातून मागणी येऊ लागली आहे. जगाची भारताकडे पहाण्याची दृष्टी पालटली आहे. भारतीय विद्यापिठे आणि भारतीय शिक्षण, म्हणजे काहीतरी अल्प प्रतीचे, ही मानसिकता भारतीय विद्यार्थ्यांनीही सोडली पाहिजे अन् सरकारने येथील प्रशासकीय व्यवस्था शिक्षण आणि नोकरी यांसाठी अनुकूल केली पाहिजे.
‘गूगल’, इलॉन मस्क यांची ‘टेस्ला’, ‘सेमीकंडक्टर्स’ बनवणारी ‘फॉक्सकॉन’ ही आंतरराष्ट्रीय जगप्रसिद्ध आस्थापने भारतात भरीव गुंतवणूक करत आहेत. भारतात त्यांच्या उद्योगांसाठी असणार्या अफाट संधी आणि गुणवत्ता असलेले कर्मचारी यांमुळे या आस्थापनांना स्वत:ची मुख्य कार्यालये भारतातच उघडायची आहेत. काळ पालटलेला आहे आणि भारत एक मोठी अर्थव्यवस्था म्हणून पुढे येत असतांना विद्यार्थ्यांनी विदेशाचा विचार का करावा ? हे झाले भारतीय व्यवस्थेच्या दृष्टीने विवेचन; मात्र विदेशात स्थायिक झालेल्या भारतियांच्या सुरक्षेचे काय ?
भारतियांची सुरक्षा महत्त्वाची !
‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घातलेल्या खलिस्तानवादी संघटनेचा संस्थापक गुरुपतवंत पन्नू याने कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांना ठार करण्याचे तेथील शिखांना नुकतेच आवाहन केले आहे. यापूर्वीही पन्नू याने भारतियांना धमकावले आहे. कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया येथील हिंदूंची मंदिरे अन् हिंदू यांवर खलिस्तान्यांकडून वारंवार आक्रमणे होत आहेत. यामध्ये मुख्यत्वे करून पन्नूसारखे खलिस्तानी भारतियांवर आक्रमण करण्यासाठी लोकांना उकसवत आहेत. परिणामी आज ना उद्या ते आक्रमण करतील. अमेरिकेत अद्यापही गौरवर्णीय आणि कृष्णवर्णीय असा भेदभाव केला जातो. हा भेदभाव तीव्र स्वरूपाचा आहे. भारतातील जातीव्यवस्थेतील विषमतेविषयी जेवढ्या वेळेला विदेशींकडून ऊर बडवला जातो, तेवढा अमेरिकेतील वर्णद्वेषी संघर्ष मात्र त्यांच्या जणू खिजगणतीतही नसतो. अमेरिकेत वर्णद्वेषी संघर्षामुळे अनेक कृष्णवर्णियांना प्राण गमवावे लागले आहेत. भारतीय हे अमेरिकेतील नागरिकांसाठी कृष्णवर्णीयच आहेत. भारतातील बुद्धीमान आणि गुणवत्ता असलेले विद्यार्थी अन् त्यात कृष्णवर्णीय अमेरिकनांसाठी त्यांच्या प्रगतीतील अडथळाच वाटतात. परिणामी भारतीय विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एकदा रस्ता ओलांडणार्या एका भारतीय विद्यार्थिनीला तेथील पोलिसाने भरधाव गाडी चालवून चिरडले आणि वर तो कुत्सितपणे हसला होता. तेथील न्यायालयाने त्या पोलिसाची बाजू घेत ‘त्याच्याविरुद्ध पुरावा नाही’, असे सांगत त्याची निर्दाेष मुक्तता केली, म्हणजे त्या विद्यार्थिनीला पोलिसांनीही चिरडले आणि न्यायालयानेही हात वर केले, असा प्रकार झाला. काहींमध्ये असाही समज आहे की, भारतीय विद्यार्थी विदेशात शिकण्यासाठी येतात, म्हणजे त्यांच्याकडे अधिक संपत्ती आहे. परिणामी चोरीच्या उद्देशाने आक्रमणे होतात. काही ठिकाणी भारतियांची झालेली छळवणूक, त्यांच्यावर झालेल्या आक्रमणांच्या घटना उघड झाल्या नाहीत, त्यामुळे त्या कळत नाहीत आणि एकदम मोठे काही झाले, तरच समजते. एकंदरच अमेरिकेतील आणि कॅनडाच्या काही भागांतील वातावरण भारतियांसाठी प्रतिकूल होत चालले आहे. भारतीय दूतावास या घटनांची वेळोवेळी नोंद घेऊन काही पावले उचलत असला, तरी तेवढे पुरेसे ठरत नाही, हे वारंवार होणार्या घटनांवरून लक्षात येते. भारत सरकार भारतियांविरुद्ध चिथावणी देणार्या आतंकवाद्यांना विदेशात जाऊन थेट कारवाई करण्यासारखी कृती करत नाही, तोपर्यंत त्यांच्या मनात धडकी भरणार नाही. असे काही प्रयत्न व्यवस्थेच्या बाहेर जाऊन करावेत आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण निर्माण करावे, ही सरकारकडून अपेक्षा !
भारतीय विद्यार्थ्यांवर विदेशात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी भारत सरकारने अमेरिकेवर दबाव आणावा ! |