Andhra Pradesh Accident Cricket:चालक आणि सहचालक क्रिकेट पहात बसल्याने आंध्रप्रदेशात झाला होता रेल्वे अपघात !
|
नवी देहली – आंध्रप्रदेशमध्ये २९ ऑक्टोबर २०२३ या दिवशी २ रेल्वेगाड्यांची धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये १४ प्रवाशांचा मृत्यू, तर ५० हून अधिक प्रवासी घायाळ झाले होते. या अपघाताविषयी बोलतांना श्री. अश्विनी वैष्णव म्हणाले की, रेल्वेचे चालक आणि सहचालक हे अपघात होण्यापूर्वी भ्रमणभाषवर क्रिकेट सामना पहात असल्यामुळे त्यांचे लक्ष विचलित झाले अन् अपघात घडला. भारतीय रेल्वे आता नवीन सुरक्षा उपायांवर काम करत असून त्याविषयी माहिती देतांना वैष्णव यांनी ४ महिन्यांपूर्वी झालेल्या या अपघातामागील कारण स्पष्ट केले.
सौजन्य:News 24 Digital
१. आंध्रप्रदेशमध्ये अपघात झाल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी तपासणीचा अहवाल अद्याप सार्वजनिक केलेला नाही. अपघाताच्या दुसर्या दिवशी प्राथमिक तपासात ‘रायगड पॅसेंजर ट्रेन’चे चालक आणि सहचालक यांना अपघातासाठी उत्तरदायी धरण्यात आले होते. त्यांनी दोन सिग्नल ओलांडले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. अपघातात दोघांचाही मृत्यू झाला होता.
२. रेल्वेमंत्री पुढे म्हणाले की, आता रेल्वेमध्ये आम्ही अशी प्रणाली बसवत आहोत, ज्यामुळे अशा चुकांचा शोध घेता येऊ शकेल. चालक आणि सहचालक केवळ रेल्वे चालवण्यावरच लक्ष केंद्रीत करतील, यावर पुढच्या काळात अधिक भर दिला जाणार आहे. प्रत्येक अपघातानंतर आम्ही खोलात जाऊन त्याची चौकशी करत आहोत. अपघाताचे कारण शोधल्यानंतर पुढील वेळी या कारणामुळे अपघात होऊ नये, म्हणून त्यावर उपाय शोधण्याचा आमचा प्रयत्न आहे.
संपादकीय भूमिकाप्रवाशांच्या जीविताचे मोल नसल्याचेच हे द्योतक ! या घटनेवरून असे अन्य चालकांकडून होत नसेल कशावरून ? केवळ अपघात घडत नसल्यामुळे त्यांच्या अशा कृत्यांवर पांघरूण घातले जाते, असेच आता म्हणण्याची पाळी आली आहे ! |