मधुबन नावाचे प्रति ‘लवासा’ यंदा वसईला बुडवणार ! – उत्तम कुमार, भाजप महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्ट संयोजक
|
वसई (पालघर) – वसई (पूर्व) येथे ‘मधुबन’ या रहिवासी संकुलाचे बांधकाम गत ७-८ वर्षांपासून चालू आहे. बांधकामाच्या वेळी येथे मोठ्या प्रमाणावर भराव टाकण्यात आला. काही ठिकाणी तर २० फूट उंचीचा भराव केला आहे. यामुळे पाण्याचा निचरा होणारे नैसर्गिक स्रोत बंद झाले आहेत. नैसर्गिक नाले बंद करून अनेक नाल्यांची दिशा पालटण्यात आली आहे. यामुळे मागील काही वर्षांपासून येथील काही परिसरांत पावसाचे पाणी साचते. हे बांधकाम दिवसेंदिवस वाढत असून शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत आहेत. मधुबन नावाचे प्रति ‘लवासा’ यंदा वसईला बुडवणार आहे, असे प्रतिपादन भाजपचे महाराष्ट्र प्रदेश केरळ प्रकोष्टचे संयोजक उत्तम कुमार यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘‘मधुबनमधील भराव न रोखता महानगरपालिका वसई पूर्व-पश्चिम यांना जोडणारा रस्ता उंच करत आहे; पण पाणी साठण्यावर उपाय काढत नाही. आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत. या प्रकरणाची चौकशी होणे आवश्यक असून याविषयी वसई तालुक्यात स्वाक्षरी मोहीम घेतली जाणार आहे.’’
संपादकीय भूमिकाप्रशासनाने यात वेळीच लक्ष घालून अडचण सोडवण्याच्या दृष्टीने आपले सामाजिक कर्तव्य पार पाडावे ! |