श्रीक्षेत्र खातगाव (अहिल्यानगर) येथील दासनवमी उत्सवास ३ मार्चपासून प्रारंभ !
कर्जत (जिल्हा अहिल्यानगर) – श्रीक्षेत्र खातगाव येथील श्री समर्थ रामदासस्वामी मठातील ‘दासनवमी उत्सव’ ३ मार्चपासून प्रारंभ होत आहे, अशी माहिती ‘आनंदी नारायण कृपा न्यासा’चे कार्यकारी विश्वस्त समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांनी दिली.
३ ते ६ मार्च या कालावधीत होणार्या दासनवमी उत्सवामध्ये काकड आरती, समर्थ रामदासस्वामी आणि भगवान श्रीधरस्वामी यांच्या पादुकांची अभिषेक पूजा, आरती, प्रवचन, पालखी, छबिना, महाप्रसाद, कीर्तन, हरिपाठ, सांप्रदायिक उपासना, सवया आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. प्रतिदिन रात्री ९ ते १०.३० या वेळेमध्ये तेरढोकी येथील समर्थ रामदासस्वामी मठाचे मठाधिपती ह.भ.प. श्रीरामबुवा रामदासी यांचे रामदासी कीर्तन होणार आहे. ६ मार्च या दिवशी लळिताचे कीर्तन होऊन दासनवमी महोत्सवाची सांगता होईल. तरी महाराष्ट्रातील समस्त श्री समर्थभक्तांनी या महोत्सवांमध्ये यथाशक्ती सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आनंदी नारायण कृपा न्यासा’चे कार्यकारी विश्वस्त समर्थभक्त पू. मोहनबुवा रामदासी यांनी केले आहे.