आश्रमातील एका खोलीत बसून सारे ब्रह्मांड चालवणारे आणि ईश्वरी शक्तीशी एकरूप होण्याची क्षमता असलेले परात्पर गुरु डॉक्टर आठवले !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. आज आपण परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना कसे शिकवले ? ते पाहूया !
१. परात्पर गुरु डॉक्टरांनी गोवा येथील धामसे सेवाकेंद्रात सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणार्या अनेक साधकांना आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यास शिकवणे
‘परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला सूक्ष्म परीक्षणासह आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसाठी नामजपादी उपाय करण्यास शिकवले. त्या वेळी सौ. मंगला मराठे यांच्या समवेत सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारे अनेक साधक होते. या साधकांमध्ये कु. रेश्मा नाईक, सौ. आरती पुराणिक, सौ. मनीषा पानसरे, अधिवक्ता योगेश जलतारे असे जवळजवळ २१ साधक होते. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर अभिमानाने आणि मजेने म्हणत, ‘‘द्वापरयुगात श्रीकृष्णाकडे एकच संजय होता; परंतु माझ्याकडे सूक्ष्म दृष्टी असणारे २१ संजय आहेत.’’ धामसे सेवाकेंद्रात सौ. मंगला मराठे यांच्या समवेत आताच्या सद्गुरु अनुराधा वाडेकरही होत्या. सौ. मंगलाताईंना अनेक प्रयोग उत्स्फूर्तपणे सुचत. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर अनेक साधकांना नामजपादी उपायांसाठी त्यांच्याकडे पाठवत असत. गुरुदेव, अशा अमूल्य रत्नांसारख्या साधकांचा सहवास तुम्ही आम्हाला घडवलात, यासाठी आपल्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.
२. परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातील जाणणार्या साधकांना आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी उपाय करण्यासाठी पाठवणे
त्या वेळी आम्ही साधकही एकमेकांकडून शिकत असू. सौ. मंगला मराठे यांनी रात्रंदिवस सेवा करून अनेक साधकांचा त्रास अल्प केला. यातूनच सिद्ध झालेल्या साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांनी गावोगावी साधकांसाठी उपाय करण्यासाठी पाठवण्यास आरंभ केला.
३. परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाने साधकांचा पाताळलोकाचा अभ्यास होऊ लागणे
या वेळी नामजपादी उपाय करणारा साधक देवाला प्रार्थना करून आसंदीवर बसत असे. त्याच्यासमोर त्रास असणारे अनेक साधक बसत. अनेकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पानेच या साधकांना त्रास देणार्या मोठ्या वाईट शक्तींना त्रास होत असे. यातून आमचा पाताळलोकाचा अभ्यास होऊ लागला. परात्पर गुरु डॉक्टर म्हणायचे, ‘‘पुष्कळ जणांना दैवी शक्तींच्या सप्तलोकांविषयी ठाऊक असते; परंतु वाईट शक्तींच्या रहाण्याच्या ठिकाणांचा अभ्यास कोण करतो ? त्यांचे निवासस्थान म्हणजे पाताळलोक. तो सहस्रो वर्षे दुर्लक्षितच राहिला आहे. ‘हा पाताळलोक काय आहे ? तेथील वाईट शक्तींचे जीवन कसे असते ? त्यांचा भूतलावर संचार कसा असतो ?’ या सर्वांचा अभ्यास करून आपल्याला मानवजातीपुढे एक नवा इतिहास निर्माण करायचा आहे. हा इतिहास सर्वांनाच नवीन आहे. सूक्ष्मातील जाणणारे साधकच हा इतिहास उलगडून सर्वांसमोर आणू शकतात; परंतु हे साधनाकार्य म्हणावे तेवढे सोपे नाही. तुम्ही वाईट शक्तींचे विश्व उलगडून दाखवणार आहात, तर त्या तुम्हालाही त्रास देणारच ना ! कितीही त्रास झाला, तरी आपल्याला मागे हटायचे नाही. तो सोसून आपल्याला हे सूक्ष्मातील कार्य करायचेच आहे. अथक प्रयत्न करून वाईट शक्तींविषयीचे ज्ञान आपल्याला या जगाला द्यायचे आहे.’’
अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने आम्ही सर्व साधकांनी ‘वाईट शक्ती काय बोलतात ? त्या काय माहिती देतात ?’ याचे ध्वनीचित्रीकरण, ध्वनीमुद्रण आणि लिखाण करण्यास आरंभ केला. परात्पर गुरु डॉक्टरांनी प्रेरणा दिल्यानेच, हे होऊ शकले.
४. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना सूक्ष्म परीक्षण करण्यासह आध्यात्मिक त्रास असणार्या साधकांसाठी उपाय करण्यासही शिकवून व्यापक बनवणे
साधकांसाठी नामजपादी उपाय करतांना आम्हाला हाताच्या मुद्रा आपोआपच सुचायच्या आणि त्याचा झालेला परिणाम आम्हाला समोर असलेल्या साधकांत दिसायचा. प्रत्येक नामजपादी उपायसत्र झाले की, मी परात्पर गुरु डॉक्टरांना जाऊन भेटत असे. मग ते पुढील सत्राविषयी मार्गदर्शन करत. ते म्हणत, ‘‘आता डोळे मिटून बसण्यापेक्षा डोळे उघडे ठेवून प्रत्येक साधकाकडे पाहून काय जाणवते ? ते आतून अनुभवा. कधी डोळे मोठे करून पहा, कधी कपाळावर आठ्या आणून डोळे किलकिले करून पहा.’’ अशा अनेक प्रयोगांची निरीक्षणे आम्ही लिहून ठेवत होतो. या प्रयोगांमुळे ‘आम्हीही काहीतरी समष्टीसाठी करू शकतो’, असा आमचा विश्वास वाढला आणि नवीन प्रकारची सेवा मिळाल्याने समष्टी साधनेतील उत्साह वाढला. परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक गोष्ट स्वतः करून पहात आणि लगेच ती साधकांना शिकवत. त्यांनी समष्टीपासून काहीच लपवून ठेवले नाही. ‘खरे गुरु सर्व करून नामानिराळे रहातात’, याचीच प्रचीती आम्हाला यातून येत होती. त्यानंतर त्यांनी स्वतः साधकांसाठी नामजपादी उपाय करणे बंद केले. केवळ त्यांच्या अस्तित्वानेच सर्व होऊ लागले. आता आमचा प्रवास सूक्ष्म परीक्षण करण्यासह उपाय करण्याकडेही चालू झाला. गुरुदेवांनी आम्हाला यातही व्यापक बनवले.
५. परात्पर गुरु डॉक्टरांनी या अशुद्ध नरदेहात विविध ईश्वरी गुणांचे रोपण करून त्याला ईश्वरप्राप्ती करण्यासाठी योग्य बनवणे
साधना करता करता ‘गुरुदेव जणुकाही आमच्यात नवनवीन गुणांचे रोपणच करत होते’, असेच म्हणावे लागेल ! साधकांचे केवढे हे भाग्य ! या अशुद्ध नरदेहात विविध ईश्वरी गुणांचे रोपण करून त्याला ईश्वरप्राप्ती करण्यासाठी योग्य बनवणे, हे कार्य शिवधनुष्य पेलण्याइतकेच अवघड आहे आणि हेच कार्य आम्हा सनातनच्या अनेक साधकांच्या संदर्भात स्वतः गुरुदेव करत होते. ‘गुरुदेव, आपल्या या महान कार्याविषयी बोलण्यास, लिहिण्यास माझ्याकडे शब्द नाहीत.’
६. परात्पर गुरु डॉक्टरांनी स्वतःकडे असलेले ज्ञान साधकांना भरभरून देणे
सध्याच्या कलियुगातील काही गुरु स्वतःकडेच सर्व राखून ठेवायचा प्रयत्न करतात; कारण त्यांना समाजात स्वतःचे महत्त्व वाढवायचे असते. परात्पर गुरु डॉक्टरांचे तसे नव्हते. त्यांनी त्यांच्याकडे असलेले ज्ञान साधकांना भरभरून दिले आणि अजूनही ते देत आहेत. ‘स्वतःसमवेत सर्वांना ते ठाऊक व्हावे’, अशी परात्पर गुरु डॉक्टरांची तळमळ आहे. ‘खरा गुरु कसा असतो ?’, हेच यातून लक्षात येते. त्यांनी सतत स्वतःकडे रिक्तपणाच घेतला. कधीच स्वत:च्या नावाचा गाजावाजा केला नाही. आश्रमाच्या एका खोलीत बसून सारे ब्रह्मांड चालवणार्या आणि ईश्वरी शक्तीशी एकरूप होण्याची क्षमता असलेल्या या अवतारी महान विभूतीला आमचे शतशः नमन !’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (७.२.२०२२)
|