दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम ग्रहयोग असण्यामागील कारणमीमांसा !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे ज्योतिषशास्त्रीय संशोधन
‘दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांतील आध्यात्मिक ग्रहयोगांचा अभ्यास करणे’, हा प्रस्तुत संशोधनाचा उद्देश आहे. हे संशोधन ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या ज्योतिष विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. आतापर्यंत प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘दैवी बालक म्हणजे काय ? दैवी बालकांची वैशिष्ट्ये आणि दैवी बालकांच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय संशोधन’ वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.
( भाग ३)
भाग १ – https://sanatanprabhat.org/marathi/765880.html
भाग २ -https://sanatanprabhat.org/marathi/768035.html वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
४ इ. निरीक्षणे
४ इ १. दैवी बालकांच्या संदर्भातील निरीक्षणे : दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांत सूत्र ‘४ अ’ मध्ये दिलेले ज्योतिषशास्त्रीय निकष (ग्रहयोग) किती प्रमाणात आढळले, हे पुढील सारणीत दिले आहे.
वरील सारणीवरून लक्षात येते की, महर्लाेकातून जन्म घेतलेल्या १०० पैकी ६४ बालकांच्या कुंडल्यांत ५ पैकी किमान २ निकष आहेत; म्हणजेच त्यांच्या कुंडल्यांत अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग आहेत.
४ इ २. साधकांच्या संदर्भातील निरीक्षणे : साधकांच्या कुंडल्यांत सूत्र ‘४ अ’ मध्ये दिलेले ज्योतिषशास्त्रीय निकष (ग्रहयोग) किती प्रमाणात आढळले, हे पुढील सारणीत दिले आहे.
वरील सारणीवरून लक्षात येते की, १०० पैकी ४४ साधकांच्या कुंडल्यांत ५ पैकी किमान २ निकष आहेत; म्हणजेच त्यांच्या कुंडल्यांत अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग आहेत. दैवी बालकांच्या संदर्भात हेच प्रमाण साधकांच्या तुलनेत अधिक आहे, हे यातून स्पष्ट होते.
४ इ ३. प्रत्येक निकषानुसार दैवी बालके आणि साधक यांची तुलना : सूत्र ‘४ अ’ मध्ये दिलेला प्रत्येक ज्योतिषशास्त्रीय निकष (ग्रहयोग) हा १०० दैवी बालके आणि १०० साधक यांच्या कुंडल्यांत स्वतंत्रपणे किती वेळा लागू होतो, हे पुढील सारणीत दिले आहे.
या सारणीवरून लक्षात येते की,
अ. निकष क्र. १ वगळता अन्य सर्व निकष दैवी बालकांच्या कुंडल्यांत अधिक वेळा लागू होतात. जन्मकुंडलीत निकष क्र. १ असल्यास (म्हणजे धर्मस्थानांचे स्वामी धर्मस्थानांमध्ये असल्यास) व्यक्तीला विद्या, बुद्धी आणि भाग्य यांचा लाभ होतो; पण व्यक्तीमध्ये साधनेची तळमळ असेलच, असे नाही.
आ. उत्तम स्तराच्या निकषांपैकी ‘२’ आणि ‘३’ क्रमांकांचे निकष हे महत्त्वाचे आहेत; कारण ते कुंडलीत लागू होत असल्यास व्यक्ती मायेपासून निवृत्त होऊन झोकून देऊन साधना करते. दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांत हे निकष अधिक वेळा लागू होतात.
४ ई. निष्कर्ष : दैवी बालके आणि साधक यांच्या जन्मकुंडल्यांच्या तुलनात्मक अभ्यासावरून लक्षात आले की, दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमध्ये अध्यात्माच्या दृष्टीने उत्तम योग असण्याचे प्रमाण अधिक आहे. हा दैवी बालकांच्या पूर्वजन्मीच्या साधनेचा परिणाम आहे. त्यामुळे त्यांना साधनेसाठी अनुकूल परिस्थिती लाभते. त्यांच्यात साधना करण्याची तळमळ असते, तसेच विविध आध्यात्मिक गुण उपजत असतात. त्यांचे आचार आणि विचार सात्त्विक असतात, तसेच त्यांच्यात सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असते. दैवी बालकांच्या जन्मकुंडल्यांमधील उत्तम आध्यात्मिक ग्रहयोगांमुळे ‘दैवी बालके, म्हणजे उच्च लोकांतून जन्मलेले जीव’, या विधानाला पुष्टी मिळते.
५. दैवी बालकांचा जन्म सध्याच्या परिवर्तन-काळात होणे, हे ईश्वरी नियोजन असणे !
दैवी बालकांनी स्वतःच्या आणि समाजाच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी पृथ्वीवर जन्म घेतला आहे. सध्याचा काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. आधुनिक विचारसरणी आणि आधुनिक विज्ञान यांचा उच्चतम उत्कर्ष होऊनही समाज सुखी न होता अधिकाधिक दुःखी होत आहे, तसेच सामाजिक समस्या दिवसेंदिवस जटील होत आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी समाजाने ‘धर्म आणि अध्यात्म’ यांची कास धरणे आवश्यक आहे अन् त्या दृष्टीने समाजाचे मनःपरिवर्तन आता होत आहे. अनेक संतांनी येणारा काळ हा सात्त्विक काळ असणार असल्याचे सांगितले आहे. अशा सात्त्विक काळात समाजाला ‘धर्म आणि अध्यात्म’ यांची शिकवण देण्यासाठी आध्यात्मिक दृष्टीने उन्नत असलेल्या जिवांची आवश्यकता भासेल. आता जन्म घेणारी दैवी बालके समाजाची ही आवश्यकता पूर्ण करतील. त्यामुळे या परिवर्तन-काळात त्यांचा जन्म होणे, हे ईश्वरी नियोजन होय !
६. दैवी बालकांच्या पालकांनी त्यांच्या पाल्यांची साधना होण्याला प्राधान्य देणे आवश्यक !
मनुष्याच्या जीवनावर पूर्वजन्मीचे संस्कार आणि वर्तमान जन्मात होणारे संस्कार यांचा प्रभाव असतो. दैवी बालकांवर पूर्वजन्मीचे सात्त्विक संस्कार असले, तरी वर्तमान जन्मात होणारे संस्कारही सात्त्विक असणे महत्त्वाचे आहे. दैवी बालकांना साधनेसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे मुख्य दायित्व पालकांचे आहे. दैवी बालकांना कुसंगतीपासून दूर ठेवणे, त्यांचे अनावश्यक लाड न करणे, त्यांना संतांची चरित्रे सांगणे, अध्यात्माचे ज्ञान देणे, त्यांच्याशी साधनेसंबंधी चर्चा करणे, स्वतः चांगली साधना करणे आदी प्रयत्न पालकांनी करणे आवश्यक आहे. यामुळे त्यांचीही साधना घडेल अन् समाजात एक आदर्श व्यक्ती घडवण्यात त्यांचे योगदान राहील !’
(समाप्त)
– श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद) आणि श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा.(५.१.२०२४)