इतिहास आणि धर्मशास्त्र !          

प्रबोधन मालिका 

‘अनंतकोटी ब्रह्मांडाच्या सर्व स्थिती आणि लय यांचा अभ्यास करून ‘योगादिशास्यद्वास’ ही शास्त्रीयता लक्षात आणून देण्यासाठी ‘इतिहास’ हे एक शास्त्र बनवले. त्या वैदिक लोकांना इतिहास म्हणजे काय ? आणि त्याच्या अभ्यासाचे महत्त्व काय ? हे अलीकडे थोडे थोडे समजू लागले आहे’, असे पाश्चात्त्य पंडित अन् त्यांचे मानसपुत्र आमच्याकडील आंग्ल विद्याविभूषित पंडितही मोठेपणाचा आव आणून म्हणत असतात. संस्कृत विद्वान ए.एस्. मॅकडोनेल म्हणतात, ‘History is the one weak spot in Indian litereting. It is in fact, non existent.’ (भारतीय साहित्यात इतिहास हे एक कमकुवत स्थान आहे. हे खरे तर अस्तित्वात नसलेले आहे.) वरील उतार्‍यावरून पाश्चात्त्य लोकांची इतिहासाविषयीची कल्पना कळून येते. लढाया, तह, राज्ये इत्यादी घटनांची कालानुक्रमे लिहिलेली माहिती, म्हणजे यांच्या मताने इतिहास होय. या अर्थाने असा घटनांचा कालानुक्रमे इतिहास लिहिलेला नाही. ही गोष्ट खरी आहे; परंतु इतिहास याचा अर्थ जर इतकाच असेल, तर त्याला एवढे महत्त्व देणेही व्यर्थच आहे. या सर्व घटनांचा अभ्यास करून भूतकाळाचा अभ्यास करावयाचा आणि त्यातूनच भविष्यकाळ निघत असतो. यामुळे भूतकाळाच्या अभ्यासाने भविष्यकाळाविषयीचे ज्ञान करून घ्यायचे, हा इतिहासाचा खरोखर उद्देश होय.

२५ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘पाश्चात्त्य पंडितांच्या संशोधनातील दोष, ब्राह्मणवर्गाकडे संस्कृती टिकवण्याचे काम आणि इतिहास म्हणजे ऋषिमुनींनी दिलेला बांधीव कार्यक्रम’, यांविषयीची सूत्रे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

१०. धर्म म्हणजे काय ?

‘धर्म’ हा शब्द संस्कृत भाषेत विविध अर्थांनी येतो. कर्तव्य (duty) या अर्थी, वस्तूंचा गुणस्वभाव आणि या इंग्रजी शब्दाचे रूपांतर म्हणूनही धर्म शब्द वापरतात; परंतु आपण धर्मशास्त्राचे विवेचन करत असता जो धर्म आपणास अभिप्रेत असतो, त्याच्या पुष्कळदा ज्या व्याख्या केल्या जातात, त्या मुळी ‘व्याख्या’ या नावासच अपात्र असतात. उदाहरणार्थ ‘यतोभ्युदय निःश्रेयस सिद्धि स धर्मः ।’ (अर्थ : ज्यामुळे लौकिक सुख आणि पारलौकिक आनंदाची प्राप्ती होते, त्याला धर्म म्हणतात.) यावरून धर्माचे स्वरूप कळत नाही, तर धर्माचे परिणाम कळतात. परिणाम सांगणे, म्हणजे काही त्या वस्तूची व्याख्या सांगणे नव्हे. ‘काडेचिराईत’, म्हणजे ‘ज्याने ताप बरा होतो ती’, असे सांगितल्यास कुणासही तिचे स्वरूप कळणे शक्य नाही. तिचे प्रत्यक्ष रंगरूपाचे वर्णन केल्याविना तिची व्याख्या होणे शक्य नाही; म्हणून वर संगितलेल्या धर्माच्या व्याख्या नव्हेत. कुणी धर्म म्हणजे असे समजतात; परंतु हा समाजाकरता असतो, केवळ व्यक्तीनिष्ठ नसतो. मोडणार्‍यास शासन केले जाते; परंतु कायद्याप्रमाणे वागल्यास बक्षीस मिळत नसते; म्हणून धर्म म्हणजे काय ? याची खरी व्याख्या करणे आवश्यक आहे.

अलीकडील मार्क्स लेनिनचा साम्यवादी पक्ष सोडला, तर बाकी जगातील मनुष्यमात्र आपल्यास कोणत्या ना कोणत्या धर्माचा अनुयायी म्हणवतो, ही धर्मप्रवृत्ती मनुष्यासमवेतच जन्मास आली आहे आणि साम्यवादी कितीही नाही म्हणत असले, तरी त्यांच्यातही ती धर्मप्रवृत्ती सूक्ष्मरूपाने वास करतच आहे. ते तिला दाबून टाकू पहातात एवढेच. मनुष्य बुद्धी वापरतो आणि बुद्धीची पोच जेथे असू शकत नाही, असे काही अनंत असले पाहिजे, ही जाणीव प्रत्येकाला होते. ते काय आहे, हे समजण्याची उत्कंठा तर फार असते; पण समजणे तर बुद्धीच्या आटोक्याच्या बाहेर असते, ही स्थिति मनाची झाली म्हणजे तीच धर्मजिज्ञासा होय ! अमुक एक गोष्ट आपल्या बुद्धीच्या पलीकडची आहे, ही खात्री झाली आणि त्या गोष्टीची जिज्ञासा असली की, मनुष्य श्रद्धा ठेवावयास सिद्ध होतो. आता ही श्रद्धा ठेवायाची कुणावर ? तर ज्यावर आपला विश्वास असेल त्याच्यावर. मग असा विश्वासार्ह मनुष्य असला, तर त्या मनुष्याचा उपदेश हा धर्म होतो. त्या ठिकाणी मनुष्य बुद्धीने कीस काढत बसत नाही; कारण ‘आपल्या बुद्धीच्या आटोक्याच्या बाहेरील काही गोष्ट हा सांगत आहे आणि ती मला पाहिजे, हा सांगणारा लबाड नाही, तेव्हा जरी ती गोष्ट मला समजत नसली, तरी त्याच्या म्हणण्याप्रमाणे केली पाहिजे’, अशी प्रवृत्ती होते. ही प्रवृत्ती करणारी प्रेरणा हाच धर्म होय. अर्थात् तसे केल्यानंतर उत्पन्न होणारे फळ जर अनिष्ट असेल, तर ती प्रेरणा धर्म ठरणार नाही; म्हणून बुद्धीच्या आटोक्याबाहेरील इष्ट साधवून देणारी आप्ताची प्रेरणा म्हणजे धर्म होय. हे धर्माचे लक्षण होय.

११. संशोधन केल्यास वेदांमधून निघणारा धर्म मुख्यतः आधिदैविक आहे हेच अंतिम !

अभ्यास करावयाचा तो पद्धतशीर करावा. तुम्ही आम्ही प्रत्यक्ष प्रमाण मानतो ना ? ठीक आहे; परंतु आजही भौतिकशास्त्रज्ञ २ तर्‍हेचे प्रत्यक्ष मानतात. एक लौकिकप्रत्यक्ष आणि दुसरे शास्त्रप्रत्यक्ष. ही २ प्रत्यक्षे तुम्हास मानावीच लागतील. आज पदार्थविज्ञानशास्त्र, प्राणीशास्त्र आणि रसायनशास्त्र यांत ही सर्व प्रत्यक्षप्रमाणाची शास्त्रे असूनही प्रत्येक गोष्ट डोळ्याने दिसलीच पाहिजे, असा आग्रह धरून चालत नाही. पाण्यात बारीक जंतू आहेत, तर ते नुसते दिसले पाहिजेत. सूक्ष्मदर्शकावर (‘मायक्रोस्कोप’वर) आम्ही का विश्वास ठेवावा ? हा फसवत नसेल कशावरून ? असे म्हणता येणार नाही. लहान वस्तू मोठी दाखवण्याचे शास्त्रीय पद्धतीने सूक्ष्मदर्शक (मायक्रोस्कोप) हे साधन ठरल्यावर त्याच्या साहाय्याने दिसले, तरी तेही प्रत्यक्षच होय. तसेच अनुमान आणि अर्थाप्रमाणे उत्त्पत्ती ही प्रमाणेसुद्धा फार मोठ्या प्रमाणावर आजच्या शास्त्रात मानतात. नाही तर ‘मॉल्यूक्युल’सुद्धा कुणी कधी पाहिला नसता. त्याच्यात अनेक ‘ॲटम’ आणि त्या ॲटममध्ये अनेक ‘इलेक्ट्रॉन’ असून बरीच पोकळी असते इत्यादी कल्पना करणे, हा निव्वळ मूर्खपणा ठरला असता.

तेव्हा संशोधन करतांना आणि ते संशोधन पटवून देतांना लोकप्रत्यक्ष, शास्त्रप्रत्यक्ष आणि तदन्तर्भूत अनुमानादि प्रमाणे वापरावी लागतील अन् ती निर्दोष असावीत, याची काळजी घ्यावी लागेल. असे न केले तर जो हेतू की, आम्हास पटवणे, तो व्यर्थ होईल.  ग्रंथप्रामाण्य मनावयाचे नाही, तर मानू नका. बाकीची प्रमाणे वापरा. आधिदैविक पटत नाही म्हणता; पण ते वेदांत ठिकठिकाणी आढळून येते. तेव्हा केवळ शास्त्रीय संशोधकाची भूमिका घेऊन वेदकालीन ऋषी आधिदैविक मानत होते इतके तर नक्की ? आता हे ऋषिमुनी तुमच्याइतके सुशिक्षित नसल्यामुळे त्यांच्या वेडगळ कल्पना होत्या, असे म्हणाल, तरी हरकत काही नाही. आमचे म्हणणे इतकेच की, जे म्हणता ते सिद्ध करा. ‘आधिदैविक खोटे आहे’, अशा असिद्ध गोष्ट प्रमाणाविना ठोकून देऊ नका. प्रामाणिकपणे संशोधन केल्यास वेदांमधून निघणारा धर्म मुख्यतः आधिदैविक असणे, हेच स्वाभाविक आहे, असे कळून येईल.

१२. धर्मांतर रोखण्यासाठी स्थापन झालेले समाज आणि त्यांचा पाया

ज्या वेळी धर्मांतराची लाट उत्पन्न होते, तेव्हा ती थोपवण्यास असा विशेष पंथ उत्पन्न न करता लाट थोपवण्याचे कार्य करणार्‍या लोकांमध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी (१८२५) यांचे नाव चिरस्मरणीय आहे. हे मुंबईस चौपाटीवर दंडा रोवून उभे रहात आणि मिशनरी पद्धतीने भाषणे देऊन परधर्मात जाणार्‍यांना परतवत.

अ. ब्राह्मोसमाज : यांचे संस्थापक राजा राममोहन रॉय हे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या तालमीत सिद्ध झालेले. ख्रिस्ती धर्माविषयी प्रेम. तंत्र सांप्रदायात वाढलेला. बहुतेक ख्रिस्तीत्वाची नक्कल; पण काही भेद (फरक) आहेत. ख्रिस्ती ‘Soul’, ‘God’ and ‘holy ghost’, म्हणजेच अनुक्रमे जीव, ईश्वर, ईश्वरी शक्ती अशी त्रिमूर्ती (trinity) मानतात. हे (ब्राह्मोसमाज) मानत नाहीत. ईश्वर आहेच त्याने जग केले. त्याची प्रार्थना केली की, कृपा करतो; म्हणून प्रार्थनाप्रधान आणि थोडे संस्कार, असे ब्राह्मोसमाज मानतो.

आ. आर्यसमाज : याचे संस्थापक दयानंद सरस्वती मूळचे काठेवाडी येथील ब्राह्मणांचा मुलगा. नवीन हिंदु धर्म बनवावा ही इच्छा. यांनी तपस्या केली. प्रथम महाराष्ट्रात फिरले आणि नंतर पंजाबमध्ये गेले. वेदांहून इतर काही प्रमाण मानत नाहीत. ‘अग्नि उपासना’ प्रमाण अभिप्रेत अर्थ वेदातून ओढाताणाने आणण्याचा प्रयत्न. पुनर्जन्म मानत नाहीत. मूर्तीपूजा नाही; पण या दोन्ही गोष्टी वेदांत आहेत. दयानंदांनी वेदांचे अर्थ लावले, त्यात वेदांचे अभ्यास करणारे विद्वान श्रीपाद सातवळेकर यांनी ४ सहस्र चुका दाखवल्या; म्हणून ते आर्यसमाजी बनले असूनही त्यांना आर्यसमाजातून हद्दपार करण्यात आले. अग्निपूजा प्रमाण मानतात; पण मुळाशी तत्त्वज्ञान आणि शास्त्रीय पाया नाही; म्हणून अग्निपूजा का मान्य ? हे सांगू शकत नाहीत.

इ. थोसोफिस्ट (Thosophist ) : जे कार्य आर्यसमाजी लोकांनी पंजाबात केले, तेच ब्राह्मसमाजाने बंगालमध्ये केले. रामकृष्णांची शिष्य मंडळी मुख्यतः ब्राह्म समाजातून आलेली, तसेच काम महाराष्ट्रात ‘थिओसॉफी’ (ब्रह्मविद्या)ने केले. ब्लॅव्हस्की नावाच्या रशियन महिलेला एक ब्राह्मण भेटला. त्याच्याकडून ती महिला काही मंत्रविद्या इत्यादी शिकली. पुढे अमेरिकेत गेली. तेथे कर्नल अर्काट यांच्या साहाय्याने या पंथाची स्थापना केली. काही कल्पना अतींद्रिय सृष्टीत या मोठ्या कुटुंबाची व्यवस्था ठेवणारे ‘गार्डियन्स’ (पालक) आहेत; म्हणून सर्व धर्मांचे ऐक्य करणे जरूर आहे इत्यादी.

१३. धर्म मुख्यतः आधिदैविकच !

एकंदर वैदिक वाङ्मयावरून असे स्पष्ट दिसते की, हिंदु धर्म हा मुख्यतः आधिदैविक आहे. अध्यात्म हे ध्येयभूत असले, तरी जीवदशेत असलेल्या मनुष्याला काही पटकन अध्यात्मावर उडी मारता येत नाही. जीवदशेतून अध्यात्मापर्यंत जाण्याचा मार्ग आहे आणि हा शास्त्रीय आहे. ‘हे अखिल विश्व सप्तलोकात्मक असून देवता यांतील शक्ती होत’, अशी कल्पना स्पष्ट वेदांतून दिसून येते आणि ‘ही सप्तलोकात्मक सृष्टी जीव अन् अध्यात्म यांना जोडणारा पूल आहे’, अशी ऋषिमुनींची कल्पना आहे, असे दिसून येते. ‘तमसो मा ज्योतिर्गमय’ (अर्थ : मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने) इत्यादी प्रार्थनेवरून ऋषींना ज्योती प्राप्त होती आणि त्याकरता साहाय्य करण्यास देवतांच्या साहाय्याची ते याचना करत’, हे अनेक सूक्तावरून दिसते. या देवतांचा उल्लेख इतका विपुल आहे की, प्रत्येक कर्मात देवतेचा संबंध असल्याखेरीज ती पूर्ण होत नाही. यामुळे वर जाणार्‍या सर्व जीवांना या सातही लोकांच्या जीवांशी परस्पर दळणवळण कर्मांद्वारे ठेवावेच लागते, हे यातून स्पष्ट दिसते. यावरून ‘धर्म हा मुख्यतः आधिदैविक आहे’, असेच म्हणावे लागते.’

– (कै.) न. ना. भिडे, पुणे.

(समाप्त)

(साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी ते मार्च २०२४)