Pakistan Elections Rigging Probe : निवडणुकीतील हेराफेरीची चौकशी केल्याखेरीज पाकिस्तान सरकारला मान्यता देऊ नका !
अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ३३ खासदारांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून केली मागणी !
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील सत्ताधारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या ३३ खासदारांच्या एका गटाने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि परराष्ट्रमंत्री अँटोनी ब्लिंकन यांना पत्र लिहिले आहे आणि त्यांना विनंती केली आहे, ‘निवडणुकीतील हेराफेरीची विश्वासार्ह आणि पारदर्शक पद्धतीने चौकशी होईपर्यंत पाकिस्तानच्या नवीन सरकारला मान्यता देऊ नका.’ या खासदारांमध्ये मुसलमान खासदार रशिदा तलेब, इल्हान उमर आणि आंद्रे कार्सन यांचाही समावेश आहे. तसेच भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांचीही स्वाक्षरी आहे.
१. खासदारांच्या गटाने म्हटले आहे, ‘अशा प्रकारचे आवश्यक पाऊल उचलल्याखेरीज पाकिस्तानी अधिकार्यांचे लोकशाहीविरोधी वर्तन थांबणार नाही. या वर्तनामुळे देशातील नागरिकांची लोकशाही इच्छाशक्ती कमकुवत होऊ शकते.’ तसेच राजकीय अटकेत असलेल्या लोकांना सोडण्याची मागणीही या पत्रात करण्यात आली आहे.
२. पाकमधील राजकीय पक्षांनी पाकिस्तानात ८ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत अनियमितता झाल्याचे अनेक पुरावे सादर केले आहेत. इम्रान खान यांच्या ‘पीटीआय’ पक्षानेही यासंदर्भात आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला पत्र लिहिले आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी करणारे अमेरिकेतील सत्ताधारी पक्षाचे खासदार पाकिस्तानमधील हिंदूंवर होणार्या अत्याचारांच्या प्रकरणांच्या संदर्भात अशी मागणी का करत नाहीत ? |