सात्त्विक आहाराचे महत्त्व !

‘जिभेला आवडणारेच अन्न जर आपण खाल्ले, तर हे आरोग्यवर्धक नाही; कारण त्यातून संतुलित आहार घेतला जात नाही. उदा. पाणीपुरी, भेळ, चाट पदार्थ, खमंग आणि चवदार पदार्थ, पनीर, पिझ्झा, बर्गर, मॅगी, नूडल्स, आईस्क्रीम, केक, पेस्ट्री वगैरे वगैरे.

अन्नावरून व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व ठरवता येणे

असे पदार्थ वरचेवर अधिक प्रमाणात खाण्यात आले, तर स्वाभाविकच त्याचे शरिरावर आणि मनःस्वास्थ्यावर परिणाम कालांतराने दिसायला लागतात. आपण जेवण कुठे घेतो ? कसे घेतो ? कशा प्रकारचे घेतो ? याला फार महत्त्व आहे. आपल्या वृत्तीवर त्याचा परिणाम होत असतो. अंतरंगाची शुद्धता ही अन्नाच्या विवेकावर वा शुद्धतेवर अवलंबून असते. स्वयंपाक करणार्‍यांच्या अंतःकरणातील भावना आणि शुद्धता ही त्या अन्नात उतरत असते. त्यावरून ते अन्न कसे आहे, हे ठरत असते. त्याचसमवेत समोरची व्यक्ती काय खाते ? कशा प्रकारे खाते आणि किती खाते ? यावरून व्यक्तीमत्त्व अन् स्वभाव यांचा अंदाज येतो. थोडक्यात त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्त्व ठरवता येते.

‘हरि चिंतन’ करत अन्नसेवन करणे हे सारतत्त्व !

जेवढा सात्त्विक, शुद्ध आहार तेवढा स्वभाव सात्त्विक असतो. सात्त्विक आहार, म्हणजे पुष्ट आहार नव्हे. सात्त्विकतेत समर्पण आणि भक्तीप्रेमाचा अंतर्भाव होत असतो. सात्त्विक अन्न शुद्ध धनाचे, शुद्ध मनाचे आणि शुद्धतेचे सार असते. अन्नामुळे मन घडत जाते. अलिकडे अन्नसेवनाविषयी आवश्यक ती दक्षता घेतल्याचे कुठेही आढळून येत नाही. उलटपक्षी स्वैराचारच अधिक जाणवतो. पचेल एवढेच खावे, हा साधा संयम पाळणारेही बोटावर मोजण्याइतके आढळतात. जर अन्नसेवनावर आणि शुद्धतेवर सदैव विवेक बाळगला, तर त्या अन्नसेवनातून प्रसन्नता प्राप्त होते. मन आनंदी अन् उल्हासित होते. त्याचसमवेत ‘हरि चिंतनी अन्न सेवित जावे’, या संत उक्तीची प्रचीती घेत अन्नसेवन केले, तर मग सोन्याहून पिवळे ! ते तर अन्नसेवनाचे सारतत्त्व आहे.

– एक धर्मप्रेमी