वारकर्यांकडून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा सत्कार !
मुंबई, १ मार्च (वार्ता.) – ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत येणार्या ‘ब’ वर्गातील तीर्थक्षेत्रांचा पायाभूत विकास होण्यासाठी शाश्वत वाढीव निधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजने’ला नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मान्यता देण्यात आली होती. आता या योजनेच्या माध्यमातून तीर्थक्षेत्रांना अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिला जात आहे, तसेच पर्यटन विभागाच्या वतीनेही प्रादेशिक पर्यटन विकास योजनेच्या अंतर्गत अनुमाने १ सहस्र कोटी रुपयांचा निधी हा तीर्थक्षेत्रांच्या पर्यटन विकासासाठी उपलब्ध करून दिल्याविषयी अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचा २९ फेब्रुवारी या दिवशी विधानभवनात सत्कार करून त्यांचे आभार मानले.
या वेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले आणि त्यांच्या समवेत ह.भ.प. महंत शिवाजी महाराज, लक्ष्मण मेंगडे, परमेश्वर बोधले, लक्ष्मण तकीक, विरुपाक्ष शिवाचार्य महास्वामी, राधाबाई सानप यांसह महाराष्ट्रातील अनेक ह.भ.प., कीर्तनकार आणि वारकरी उपस्थित होते.
राज्यातील आध्यात्मिक क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतल्याविषयी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश बोधले महाराज यांच्यासह वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराजांनी विधानभवनात उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक आणि यात्रेकरू यांना विविध सोयीसुविधा पुरवणे आवश्यक आहे; मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांना त्यांच्या तुटपुंज्या उत्पन्नामुळे या सोयीसुविधा पुरवणे शक्य होत नाही. वर्ष २०१२ पासून २ कोटी रुपये इतका निधी दिला जात असे. त्यात आता आणखी ३ कोटी रुपयांची भर पडली आहे. शासनाने ग्रामीण भागातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी एकूण ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.
|
या निधीतून काय करता येईल ?
तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी मंदिरापर्यंत रस्ते, पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे, स्वच्छतागृह, शौचालय, वाहनतळ, भक्त निवास, रस्त्यांवरील दिवे आणि संरक्षण भिंत, वृक्ष लागवड करणे इत्यादी सुविधा या निधीतून उपलब्ध करून दिल्या जातील.
४८० तीर्थक्षेत्रांना होणार लाभ !
राज्यात ‘ब’ वर्ग दर्जा असलेली १६ नोव्हेंबर २०१२ पूर्वी १०५ तीर्थक्षेत्र मान्य होती. त्यानंतर ३७५ तीर्थक्षेत्र मान्य करण्यात आली. अशी राज्यात एकूण ४८० ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्र आहेत. या तीर्थक्षेत्रांना वाढीव निधीचा लाभ होणार आहे. तीर्थक्षेत्रास भेट देणार्या भाविकांची संख्या ४ लाख असल्यास पोलीस अधीक्षकांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.