विधानभवनाच्या आवारात मंत्री-आमदार भिडले !
मंत्री दादा भुसे यांच्याकडून आमदार महेंद्र थोरवे यांना धक्काबुक्की !
मुंबई, १ मार्च (वार्ता.) – राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या म्हणजे १ मार्च या दिवशी शिवसेनेतील २ आमदारांमध्ये वाद झाला. कर्जत येथील शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे आणि मंत्री दादा भुसे यांनी विधानभवनाच्या परिसरातच एकमेकांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला आहे. या दोघांमधील वाद एवढा वाढला की, त्यांना थांबवण्यासाठी मंत्री शंभूराज देसाई आणि आमदार भरत गोगावले यांना मध्यस्थी करावी लागली. ‘आचारसंहिता लागण्यापूर्वी माझ्या मतदारसंघातील कामे पूर्ण करून द्या’, अशी मागणी आमदार थोरवे यांनी दादा भुसे यांच्याकडे केली होती.
‘सत्ताधारी पक्षाच्या २ आमदारांमध्ये अशा प्रकारे वाद होत असेल, तर यातून त्यांची संस्कृती दिसून येत आहे’, अशी टीका विरोधकांनी केली आहे.
धक्काबुक्की झाली नाही ! – शंभूराज देसाई, मंत्री
एकमेकांशी चर्चा करतांना कुणाचा आवाज मोठा वाटला, म्हणजे वाद झाला, असे नाही. आमदारांची जी कामे प्रलंबित आहेत, त्यासाठी आम्ही उद्याच चर्चा करून तोडगा काढू.
‘‘थोरवे माझे मित्र, आमच्या पक्षाचे सहकारी आमदार आहेत. असा कुठलाही प्रकार येथे झालेला नाही. तुम्ही विधीमंडळातील हाणामारीचे सीसीटीव्ही चित्रण सदस्यांना दाखवा.’’
– दादा भुसे, मंत्री