ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण स्थापन करण्यात येणार ! – अजित पवार
मुंबई, १ मार्च (वार्ता.) – राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी अंतरिम अर्थसंकल्पात प्रावधान करण्यात आले आहे. कोल्हापूर येथील श्री ज्योतिबा देवस्थानाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ‘ज्योतिबा देवस्थान प्राधिकरण’ स्थापन करण्यात येईल’, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १ मार्च या दिवशी अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देतांना विधानसभेत केली. यासाठी विविध समित्यांच्या मान्यतेविषयीची कार्यवाहीही जलदगतीने करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पवार यांनी या वेळी मांडलेली सूत्रे
१. राज्याची आर्थिक स्थिती चांगली असून राज्याला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत गाठण्यात येणार आहे.
२. राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांना प्रतिलिटर ५ रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेच्या कार्यवाहीसाठी ‘सॉफ्टवेअर’ विकसित करण्यात आले असून दूध उत्पादकांना थेट अधिकोषाच्या खात्यात त्याचा लाभ वर्ग करण्यात येईल.
३. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, आशा स्वयंसेविका मानधन, निवासी आधुनिक वैद्यांच्या विद्यावेतनात वाढ केली आहे.
४. नैसर्गिक आपत्तीत हानी झालेल्या शेतकर्यांना साहाय्य म्हणून १ रुपयात पीकविमा, नमो शेतकरी सन्मान निधी, गरीब-गरजूंना आनंदाचा शिधा अशा योजनांसाठी, तसेच महापुरुषांच्या स्मारकासाठीही निधीचे प्रावधान केले आहे.
५. राज्य स्थूल उत्पन्नात प्रतिवर्षी १० टक्के वाढ होत असून त्यात भरीव वाढ करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत.