संपादकीय : भारत अजिंक्य होवो !
भारत प्रत्येक क्षेत्रात उत्तरोत्तर प्रगती करत असून त्यात तो यशस्वीही होत आहे. सर्वच क्षेत्रांच्या जोडीला संरक्षण क्षेत्रही काही मागे राहिलेले नाही. संरक्षण क्षेत्रातील भारताची भरभराट वाखाणण्याजोगी आहे. यातच आता एक पाऊल पुढे टाकत भारताने कानपूर (उत्तरप्रदेश) येथे शस्त्रास्त्रांचा मोठा कारखाना उभारला आहे. हा दक्षिण आशियातील सर्वांत मोठा संरक्षण कारखाना आहे. या कारखान्याच्या माध्यमातून भारताच्या संरक्षणाविषयीच्या सर्वच आवश्यकता पूर्ण केल्या जाणार आहेत. त्याच्या जोडीला आपण जागतिक स्तरावरील संरक्षणाच्या मागण्याही पूर्ण करणार आहोत. येथे क्षेपणास्त्रेही बनवली जाणार आहेत. एका कारखान्यामुळे भारताला जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण स्थान लाभेल, हे निश्चित ! संरक्षण क्षेत्रातील या भरारीमुळे भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर दबदबा निर्माण होईल आणि शत्रूराष्ट्रांनाही वचक बसेल ! कारखान्याचे उद्घाटन झाल्याने पाकिस्तानला धडकी भरली आहे. पाकिस्तानमधील तज्ञ मंडळी यामुळे भयभीत झालेली आहेत. ‘भारत आता काय करील, याचा काही नेम नाही’, अशी धास्ती ते बाळगून आहेत. पाकिस्तानची सद्य:स्थिती संपूर्ण जगाला ठाऊक आहे. तेथील महागाईने उच्चांक गाठला आहे. गरिबीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांना खायला-प्यायला मिळत नाही. अशा स्थितीत आपल्या नागरिकांचे हाल दूर न करता पाकिस्तानचा डोळा मात्र भारताच्या शस्त्रसामुग्रीवर आहे. पाकने प्रथम स्वतःची स्थिती सुधारावी; कारण यशोशिखराकडे मार्गक्रमण करणारा भारत पाकच्या कदापि हाती लागणार नाही, हे पाकने लक्षात ठेवावे.
भारतासाठी युद्धसज्ज असणे, ही काळाची आवश्यकता आहे; कारण भारताची भूमी गिळंकृत करायला पाक आणि चीन यांसारखे शत्रूदेश टपून बसले आहेत. त्यातही चीनला सामोरे जायचे असेल, तर भारताला शस्त्रनिर्मिती क्षेत्रात भरीव कामगिरी करावी लागेल. युद्धसज्जतेविषयी १० वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. आता ती पालटत आहे. आता या कारखान्याच्या माध्यमातून सैन्यदलाला आणखी उभारी मिळेल आणि सैनिक सर्वशक्तीनिशी शत्रूंचा सामना करण्यासाठी सिद्ध होतील. हे भारताचे उज्ज्वल भवितव्य असेल; पण शत्रूराष्ट्र पाकसाठी मात्र तो पराभव असेल. ‘युद्ध नको असेल, तर युद्धसज्ज रहायलाच हवे’, असे म्हटले जाते. भारताची सर्व बाजूंनी कोंडी करणारी शत्रूराष्ट्रे पहाता भारताला युद्धसज्ज रहाणे क्रमप्राप्त आहे. ही सर्व पार्श्वभूमी पहाता कानपूर येथे स्थापन करण्यात आलेला कारखाना भारताला बळकटी देत आत्मनिर्भरतेच्या शिखरापर्यंत घेऊन जाईल, हे निश्चित !
काँग्रेसचे षड्यंत्र !
गेली ५४ वर्षे काँग्रेसने भारतावर राज्य केले; पण ना राष्ट्राभिमान जागृत केला, ना नागरिकांना कणखर बनवले. त्यामुळे नेभळट वृत्तीच सर्वांमध्ये निपजत गेली. परिणामी शस्त्रांचा वापर करणे दूरचीच गोष्ट झाली. जी काही थोडीथोडकी शस्त्रे होती, ती विनावापर तशीच धूळ खात पडून होती. कधी आवश्यकता भासलीच, तर ती आयात केली जायची. शस्त्रनिर्मितीत स्वयंपूर्ण न होता आहे त्यातच समाधान मानले जायचे. अर्थात् हे समाधान मानणे म्हणजे झाली वरवरची बाजू; पण काँग्रेसचे यामागील षड्यंत्र वेगळे होते. शस्त्रास्त्रांच्या निर्मितीच्या दृष्टीने विचार केला असता, तर शत्रूराष्ट्रांसमवेत संगनमत करता आले नसते. आतंकवाद्यांसाठी पायघड्या घालता आल्या नसत्या. हे लक्षात घेऊन काँग्रेसने पूर्ण विचारांती ‘शस्त्र’ या संकल्पनेलाच तिच्या सत्ताकारणातून लाथाडले आणि स्वतःची मनमानी चालूच ठेवली. शस्त्रांविना असणार्या मनुष्यात तेज, बळ, धाडस येणार कुठून ? ‘शस्त्र’ या संकल्पनेला हिंसेशी जोडून ते बाळगणे, त्याचा वापर करणे म्हणजे हिंसेचे समर्थन करण्यासारखे आहे’, असे सांगत महात्म्यांनी (?) अहिंसेचे डोसच भारतियांना पाजले. यामुळे हिंदू निःस्तेज आणि बलहीन झाले. स्वधर्म, राष्ट्र यांवर होणार्या आघातांविषयीही त्यांना काही वाटेनासे झाले. काँग्रेसचे हे कारस्थान दुर्दैवाने यशस्वी झाले. स्वातंत्र्यानंतरही भारताची भरभराट न होण्याला सर्वस्वी काँग्रेस पक्षच उत्तरदायी ठरला. आता या काँग्रेसचे उरलेसुरले राजकीय अस्तित्वही येत्या निवडणुकीच्या माध्यमातून मिटवण्याची वेळ आली आहे.
नुकतेच कर्नाटक काँग्रेसचे बीके हरिप्रसाद म्हणाले, ‘‘पाकिस्तान हे भाजपसाठी शत्रूराष्ट्र आहे; पण आमच्यासाठी नाही.’’ यावरूनच काँग्रेसला पाकचा किती पुळका आहे ? हे पुन्हा एकदा उघड होते. या मित्राचे सर्वच चोचले काँग्रेसने आजवर पुरवले आहेत; पण आता याची पुनरावृत्ती होणे नाही ! कारण देश जागृत होत आहे.
गेल्या काही दशकांमध्ये चीनसारखे काही बलाढ्य देश त्यांच्या सैनिकी सामर्थ्याची झलक दाखवायचे, मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करायचे; परंतु त्यात भारत देश पुष्कळ मागे होता. ‘भारत युद्धसज्ज आहे’, असे दाखवले जायचे; पण प्रत्यक्षात चित्र उलट असायचे. नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर सैन्यदलांच्या विविध ठिकाणांना वेळोवेळी भेटी देऊन सैनिकांचे मनोबल उंचावले. यासह शस्त्रास्त्रनिर्मितीत स्वावलंबी होण्याची कणखर घोषणा करत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. या स्वावलंबनाच्या मार्गावर होत असलेली भरभक्कम प्रगती आता आपण पहात आहोतच ! डॉ. अब्दुल कलाम यांना जसा भारत अपेक्षित होता, तसाच तो आता घडत आहे. हे सुखावह आहे.
विजयश्री खेचून आणावी लागेल !
जगात शस्त्रास्त्र साहित्य निर्माण करणार्या महत्त्वाच्या १५ कारखान्यांमध्ये ६ कारखाने हे चीनचेच आहेत. त्याने जगाला उघडउघड धमकी दिली आहे की, वर्ष २०३५ पर्यंत आमचे सैन्य ‘सर्वांत शक्तीशाली सैन्य’ म्हणून नावारूपाला येईल. जर चीन यात यशस्वी झाला, तर संपूर्ण जगासाठी ती धोक्याची घंटा ठरेल. यामुळे भारताने याकडे गांभीर्याने पहात भारतीय सैन्याचे लवकरात लवकर आधुनिकीकरण कसे होईल ? यासाठी प्रयत्न करायला हवेत. भारताचा इतिहास विजयाचा आहे. भारताने नेहमीच विजयश्री खेचून आणली आहे. त्यामुळे ‘सर्वांत शक्तीशाली सैन्य’ असलेला भारत ही विजयश्रीही खेचणे आता अपेक्षित आहे. भारताची भूमी आध्यात्मिक असली, तरी ती युद्धभूमीही आहे. त्यामुळे या युद्धभूमीतील भारताचे संरक्षणात्मकदृष्ट्याही तितकेच महत्त्व आहे. कोणे एकेकाळी केवळ काही शस्त्रांच्या बळावर आपण लढत होतो. आता आपल्याकडे शस्त्रांचा सुसज्ज असा कारखाना आहे. हे अल्प कालावधीत भारताने साध्य केलेले यशच आहे. हे यश असेच संपादन करत भारत अजिंक्य होवो, हीच अपेक्षा !
कानपूर येथील शस्त्रास्त्रांचा कारखाना भारताला संरक्षणदृष्ट्या बळकटी देत आत्मनिर्भरतेच्या शिखरापर्यंत नेईल ! |