माहेरघर विद्येचे कि नशेचे ?
पुणे येथे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यातील ३ दिवसांत पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत जवळपास साडेतीन सहस्र कोटी रुपयांचे अमली पदार्थ पकडले. जे पुणे विद्येचे, संस्कृतीचे माहेरघर समजले जाते, त्याच पुण्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ येत असतील आणि तरुण पिढी अशा नशेला फसत असेल, तर हा सांस्कृतिक शहराच्या दृष्टीने किती मोठा धोका आहे, हे लक्षात येते. ज्या पुण्यात राष्ट्र, धर्म, संस्कृती रक्षणाच्या चळवळी उभ्या राहिल्या, त्याच पुण्यात अशा अनैतिक, नीतीहीन घटना घडत असतांना पुणेकर किंवा अन्य संघटना यांवर विशेष काही बोलतही नाहीत, हे दुर्दैवी आणि आश्चर्यकारक आहे. एकेकाळी ज्या लोकमान्य टिळक यांनी समाजाचे संघटन व्हावे आणि यातून राष्ट्रभावना जागृत व्हावी, यांसाठी सार्वजनिक गणेशोत्सव चालू केला, ते हेच पुणे ना ? ज्या पुण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांनी परकियांविरुद्ध लढून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ते हेच पुणे ना ? स्वामी विवेकानंद म्हणायचे, ‘एखाद्या देशाचे ५० वर्र्षांनंतरचे भवितव्य जाणून घ्यायचे असेल, तर त्या देशाची तरुण पिढी काय करत आहे ? हे पहावे.’ यानुसार आता विचार केला, तर तरुण पिढी नशेच्या दरीत पडत असेल, तर उद्या देश अंधःकाराच्या खाईत जायला वेळ लागणार नाही. आज भारत विश्वगुरु होण्याचे स्वप्न सर्वजण पहात असतांना अशा प्रकारे तरुण पिढी मोठ्या प्रमाणात नशेखोर झाली, तर तरुण पिढीचे भवितव्य नसणारा ‘भोगवादी देश’ म्हणून भारताची ओळख होईल कि काय ? अशी भीती वाटू लागली आहे. शाळेपासून महाविद्यालयांपर्यंत होणारे अमली पदार्थांचे सेवन, तसेच विविध अमली पदार्थांची पुण्यात सहज होणारी उपलब्धता ही चिंतेची गोष्ट आहे. अमली पदार्थांच्या या लाटेत तरुण पिढी अक्षरशः वाहून जात आहे. तरुण पिढीला शारीरिक, मानसिक दृष्ट्या अधू बनवणार्या अमली पदार्थांच्या सेवनामुळे समाजात गुन्हे वाढतात. तरुण पिढी वाईट मार्गाला लागते. अमली पदार्थांच्या वापरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला गंभीर धोका निर्माण होतो. कोट्यवधी रुपयांचा चोरटा बाजार असलेला अमली पदार्थांचा व्यवसाय संपूर्ण जगात एक प्रकारे समांतर अर्थव्यवस्थाच चालवतो, असे मानले जाते. अमली पदार्थांच्या तस्करीचा पैसा जगभरात आतंकवादासाठी वापरला जात आहे, हे वारंवार पुढे येते.
राज्य आणि केंद्र सरकारने आता देश अन् राज्य अमली पदार्थ मुक्त करायचे ठरवले आहे, ही निश्चितच चांगले; परंतु हेच यापूर्वीच केले असते, तर आताएवढे प्रचंड मोठे दुष्परिणाम होण्याचे टळले असते. गेली कित्येक वर्षे अमली पदार्थांच्या तस्करीला खतपाणी मिळून आता डोक्यावरून पाणी गेल्यावर ते जनतेसमोर एवढ्या मोठ्या प्रमाणात आले आहे. आपल्या देशात कुठल्याही समस्येचा कडेलोट झाला की, तिच्यावर उपाय योजणे चालू होते, तोपर्यंत बरेच पाणी वाहून गेलेले असते. भ्रष्ट आणि निष्क्रीय पोलीस यंत्रणा अन् त्यांच्यावर येणारा राजकीय दबाव हे याला उत्तरदायी आहेत, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ? त्यासाठी केंद्र सरकारने अन्वेषण यंत्रणांना मोकळीक द्यायला हवी. अन्वेषणात राजकीय हस्तक्षेप होऊ न देता पोलिसांनीही या प्रकरणी कडक भूमिका घेतल्यास अमली पदार्थाचा भस्मासुर आटोक्यात येऊ शकतो.
– प्रा. श्रीकांत बोराटे, भोर