संस्कृत भाषेचे सौंदर्य
प्रत्येकच क्षणी धर्माचे आचरण करावे !
अजरामरवत् प्राज्ञो विद्यामर्थं च चिन्तयेत् ।
गृहीत इव केशेषु मृत्युना धर्ममाचरेत् ॥
– हितोपतोदेश, मङ्गलाचरण, श्लोक ३
अर्थ : मृत्यू कधी येईल, ते सांगता येत नाही; म्हणून ‘आपण अमर आहोत’, असे समजून माणसाने विद्या आणि धन यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत; पण ‘मृत्यू सतत समोर उभा आहे’, असे समजून त्याने धर्माच्या नियमाप्रमाणे आचरण करावे. – हितोपदेश
धर्मपालन कसे करावे ?
न जातु कामात् न भयात् न लोभात् धर्मं त्वजेत् जीवितस्यापि हेतोः ।
नित्यो धर्मः सुखदुःखे तु अनित्ये जीवो नित्यं हेतुः अस्य तु अनित्यः ॥
एकदा हस्तिनापुरात रात्री एक ब्राह्मण पांडवांकडे ओरडत आला की, माझ्या गायी चोराने चोरल्या. अर्जुन शस्त्रे आणण्यासाठी गेला. तेथे युधिष्ठिर आणि द्रौपदी एकांतात होते, त्याने शस्त्रे घेतली आणि तो चोरांचे पारिपत्य करून परत आला. ‘कोणत्याही भावाने द्रौपदी आणि तिचा पती यांच्या एकांतात जायचे नाही’, असा नियम होता. तो मोडला. ‘जो नियम मोडेल त्याने १२ वर्षे तीर्थयात्रेला जावे’, असा नियम होता; पण अर्जुनाला युधिष्ठिर म्हणाला, ‘तू मला विचारून तेथे आलास. तू ब्राह्मणाचे कार्य करण्यासाठी आलास. तुला दोेष नाही. तू तीर्थयात्रेला जाऊ नकोस.’ त्यावर अर्जुनाने उत्तर दिले, ‘न व्याजेन चरेत् धर्मम् ।’, (महाभारत, आदिपर्व, अध्याय २३३, श्लोक ३५) म्हणजे ‘कपटाने धर्माचरण करू नये.’ धर्म पाळतांना सवडीशास्त्र असू नये. मी नियमभंग केला आहे आणि मी प्रायश्चित्त घेणार.’ त्याप्रमाणे अर्जुन तीर्थयात्रेस गेला.