‘संत म्हणजे गुरुमाऊलीच आहेत’ याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती
प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे एक दिवस रामनाथी आश्रम, गोवा येधे ‘साधनावृद्धी’ शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात जीवनातील अमूल्य अशा सूत्रांविषयी सद्गुरु आणि संत यांनी मार्गदर्शन केले. शिबिरानंतर साधिका सौ. तारा शेट्टी यांचे झालेले चिंतन आणि त्यांना आलेल्या अनुभूती येथे देत आहोत.
१. शिबिरात ‘संत म्हणजे गुरुमाऊलीच आहेत’, असा भाव ठेवण्यास सांगणे
‘शिबिराच्या प्रारंभी ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ हा विषय घेण्यात आला होता. या विषयाच्या अनुषंगाने ‘संतांशी बोलणे टाळणे’ आणि ‘मनमोकळेपणाने न बोलणे’ या २ सूत्रांचे चिंतन करतांना ‘संत म्हणजे गुरुमाऊलीच आहेत’, असा भाव ठेवून अनुभवण्यास सांगण्यात आले.
२. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी संतांविषयी भाव कसा ठेवावा, याविषयी मार्गदर्शन करणे
शिबिरात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी ‘संत म्हणजे गुरुमाऊली आहेत’, याप्रमाणे भाव ठेवतांना ‘साधकांचा संतांविषयी दृष्टीकोन कसा असला पाहिजे’, याविषयी मार्गदर्शन केले. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सांगितले, ‘‘संत म्हणजे गुरुमाऊलीच आहेत. गुरुदेवच संतांच्या माध्यमातूनच आपल्या साधनेला साहाय्य करत आहेत. साधकांना संतांकडूनच साधनेसाठी चैतन्य आणि शक्ती प्राप्त होऊन खर्या अर्थाने साधनेसाठी पुढील मार्गदर्शन मिळते.’’
३. प.पू. गुरुदेवांनी ‘संत आणि ते एकच आहेत’, याविषयी दिलेल्या अनुभूती
‘संत म्हणजे गुरुमाऊली आहेत’, असा भाव प्रत्यक्षात अनुभवण्यास मी अत्यंत अल्प पडत होते. सद्गुरु आणि संत यांच्या कृपेनेच माझ्या अल्प बुद्धीला हे समजणे शक्य झाले. तेव्हा प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला ‘संत म्हणजे गुरुमाऊलीच आहेत’, याविषयीच्या अनुभूती प.पू. गुरुदेवांनी यापूर्वीच दिल्या असल्याची जाणीव झाली.
३ अ. शरणागतभावाने प्रार्थना केल्यावर गुरुदेवांच्या जागी पू. रमानंद गौडा (सनातनचे ७५ वे (समष्टी) संत) आसनावर बसलेले दिसणे आणि प.पू. गुरुदेवांनी ‘मी आणि पू. रमानंद गौडा वेगळे नाही’, असे सांगणे : एके दिवशी मला स्वप्नात प.पू. गुरुदेव एका दिव्य अशा आसनावर बसून आम्हा सर्व साधकांना मार्गदर्शन करत असल्याचे दिसले. मार्गदर्शनाच्या शेवटी मी आणि आणखी एका साधिकेने गुरुचरणी नतमस्तक होऊन त्यांना शरणागतभावाने प्रार्थना केली, ‘हे गुरुदेव, आमचे मन निर्मळ आणि शुद्ध करा. आम्हाला तुमच्या चरणी समर्पित करून घ्या.’ त्या वेळी मला प.पू. गुरुदेवांच्या स्थानी पू. रमानंदअण्णा बसलेले दिसले. त्यांना पहाताच प.पू. गुरुदेवच पू. रमानंदअण्णांच्या रूपात आम्हाला दर्शन देत आहेत आणि गुरुदेव आम्हाला ‘पू. अण्णा आणि मी वेगळे नाही’, असे सांगत आहेत’, असे मला जाणवले. तेव्हा आमचे मन शुद्ध करण्यासाठी प.पू. गुरुदेव यापुढे पू. रमानंदअण्णांच्या माध्यमातून आम्हाला पुढे मार्गदर्शन करणार असल्याचे मला जाणवले.
३ आ. ‘भावभेट सत्संगा’च्या वेळी प.पू. गुरुदेवांनी साधिकेला ‘पू. रमानंद गौडा यांच्या चरणी नमस्कार करा’, असे सांगणे : एकदा रामनाथी आश्रमात असतांना आम्ही सर्व साधक ‘भावभेट सत्संगा’साठी प.पू. गुरुदेवांच्या दर्शनासाठी गेलो होतो. त्या वेळी एक साधिका प.पू. गुरुदेवांशी बोलतांना म्हणाली, ‘‘माझ्याकडून तुम्हीच साधना करवून घ्या. मला स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन यांमधून बाहेर पडण्यासाठी तुम्हीच साहाय्य करा.’’ त्यानंतर प.पू. गुरुदेवांनी तिथेच शेजारी बसलेल्या पू. रमानंदअण्णा यांच्याकडे निर्देश करून ‘आता माझ्या चरणी नाही, तर यांच्या चरणी नमस्कार करा’, असे सांगितले. त्या वेळी प.पू. गुरुदेवांनी आम्हाला ‘मी पू. अण्णांच्यात आहे’, हे दाखवून दिले’, असे मला वाटून माझी प.पू. गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त झाली.
३ इ. मानसपूजा करतांना प.पू. गुरुदेवांच्या चरणांच्या जागी पू. रमानंद गौडा यांचे चरण दिसणे : एकदा मी गुरुचरणांची मानसपूजा करत होते. मला पाद्यपूजेच्या शेवटी गुरूंच्या जागी पू. रमानंदअण्णा दिसले आणि गुरुचरणांच्या जागी पू. अण्णांचे चरण दिसले. तेव्हा मला ‘प.पू. गुरुदेव आणि पू. अण्णा वेगळे नसून साधकांनी पू. अण्णांमध्येच प.पू. गुरूंना पहावे’, असे गुरुदेव सांगत असल्याची अनुभूती आली. तेव्हा माझ्याकडून प.पू. गुरुदेव आणि पू. अण्णा यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.
शिबिराच्या माध्यमातून गुरुदेवांनी पुन्हा एकदा ‘संत हे गुरुमाऊलीच आहेत’ याची आम्हाला जाणीव करून दिली.
हे गुरुदेवा, तुम्ही संतांच्या रूपात सदैव आमच्यासमवेत राहून आम्हाला मार्गदर्शन करत आहात. आम्हा अज्ञानी जिवांना हे न समजल्याने संतांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्यात आम्ही सर्व साधक अल्प पडत आहोत. त्यासाठी तुमच्या चरणी क्षमायाचना करतो. संतांच्या सहवासाचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ निरंतर घेण्याची पात्रता तुम्हीच आमच्यात निर्माण करा, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना आहे.’
– सौ. तारा शेट्टी, उत्तर कन्नड जिल्हा, कर्नाटक. (८.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |