भाऊबिजेच्या दिवशी सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ९० वर्षे) सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची मानसपूजा करत असतांना त्यांनी सायुज्य मुक्तीचा आशीर्वाद देणे

‘१८.९.२०२३ या भाऊबिजेच्या दिवशी प्रतिवर्षीप्रमाणे मी डोळे बंद करून प.पू. गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) मानसपूजा केली. मी त्यांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर मी प.पू. गुरुदेवांना नमस्कार केला. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी ‘तुम्हाला काय हवे ते मागा’, असे सांगितले. त्या वेळी माझ्यात आणि प.पू. गुरुदेव यांच्यात पुढील संभाषण झाले.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

सद्गुरु कुवेलकरआजी : मला काही नको. तुम्ही मला सर्वकाही दिले आहे.

प.पू. गुरुदेव : तरीही मला तुम्हाला काहीतरी द्यायचेच आहे.

सद्गुरु कुवेलकरआजी : तुम्हाला मला जे द्यायचे आहे, ते तुम्ही देऊ शकता.

प.पू. गुरुदेव : मी तुम्हाला ‘सायुज्य मुक्ती’ देतो.

गुरुदेवांनी मला सायुज्य मुक्तीचा आशीर्वाद दिला.’

(‘एकदा ज्ञानप्राप्तकर्त्या कु. मधुरा भोसले, श्री. निषाद देशमुख आणि श्री. राम होनप यांना सद्गुरु कुवेलकरआजींचे सूक्ष्म परीक्षण करायला सांगण्यात आले होते. तेव्हा कु. मधुरा भोसले यांनी ३०.६.२०२२ या दिवशी केलेल्या सूक्ष्म परीक्षणामध्ये ‘सद्गुरु कुवेलकरआजींची सायुज्य मुक्तीकडे वाटचाल चालू झाली आहे’, असे सांगितले होते. हे लिखाण २७.९.२०२२ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाले होते.’ – संकलक)

– (सद्गुरु) श्रीमती प्रेमा कुवेलकर, कवळे, फोंडा, गोवा. (१८.९.२०२३)

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी (वय ९० वर्षे) यांना ‘घरात देवतांचे अस्तित्व आहे का ?’, असा प्रश्न पडल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने त्यांना घरात त्रिदेवांचे अस्तित्व असल्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

‘१०.१२.२०२३ या दिवशी मी नामजप करत असतांना माझ्या मनात विचार आला, ‘आपल्या घरात देवतांचे अस्तित्व आहे ना ?’ मी याविषयी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना) विचारले.

त्या वेळी प.पू. गुरुदेव सूक्ष्मातून मला म्हणाले, ‘तुम्हाला पहायचे आहे का ?’ तेव्हा मी त्यांना ‘हो’ असे सांगितले. प.पू. गुरुदेवांनी मला डोळे बंद करायला सांगितले.

मी डोळे बंद केल्यावर मला खोलीत सगळीकडे ‘ॐ’ दिसायला लागले. नंतर प.पू. गुरुदेव मला म्हणाले, ‘आता सर्व खोल्यांमध्ये, तसेच बाहेरच्या बैठक कक्षातही पहा.’ मी सर्व खोल्यांत आणि बाहेरही बघितले. तेव्हा मला जिकडे बघावे तिकडे, म्हणजे सगळीकडेच ‘ॐ’ दिसले. तेव्हा प.पू. गुरुदेवांनी सांगितले, ‘आता लक्षात आले ना की, तुमच्या घरात त्रिदेवांचे अस्तित्व आहे.’

– (सद्गुरु) श्रीमती प्रेमा कुवेलकर, कवळे, फोंडा, गोवा. (१८.९.२०२३)