महावितरणचे प्रधान यंत्रचालक संतोष कुलकर्णी सेवानिवृत्त
रत्नागिरी – येथील महावितरणचे हार्बर उपकेंद्राचे प्रधान यंत्रचालक श्री. संतोष विनायक उपाख्य काका कुलकर्णी २९ फेब्रुवारी या दिवशी सेवानिवृत्त झाले. अत्यंत निर्भीड स्वभाव आणि अन्यायाविषयी चीड, ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होत. ३२ वर्षे सेवेत असलेले श्री. संतोष कुलकर्णी यांचा सत्कार उपकार्यकारी अभियंता श्री. वाघपैजन यांच्या हस्ते झाला. या वेळी अभियंता श्री. घाडगे, श्री. वासावे, श्री. देसाई आणि कुलकर्णी कुटुंबीय उपस्थित होते.
मूळचे निवेंडी येथील श्री. कुलकर्णी यांनी येथील ‘आयटीआय’चा वीजतंत्री अभ्यासक्रम (इलेक्ट्रिशियन कोर्स) केला. त्यानंतर २ वर्षे वीजमंडळात ‘अप्रेंटीस’ पूर्ण केली.पालघर येथे मोटर वायडिंग करणार्या आस्थापनांमध्ये काम केले. ३ वर्षे महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असलेल्या ‘क्राफ्टस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’, रत्नागिरी येथे मोटर वायडिंग विभागाचे निर्देशक म्हणून काम पाहिले.
या कालावधीत वीजमंडळाच्या (फेडरेशनप्रणीत) ‘अप्रेंटीस’ संघटनेच्या अध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली. मंडळाच्या भरतीमध्ये परजिल्ह्यातील उमेदवार भरती न करता मंडळातच ‘अप्रेंटीस’ केलेल्या स्थानिक उमेदवारांचा प्राधान्याने विचार झाला पाहिजे याविषयी त्यांनी संघर्ष केल्यामुळे त्याचे परिणाम पुढील भरतीत दिसून आले. आंबोली सबस्टेशन, चाफे उपकेंद्र, लांजा येथे कनिष्ठ यंत्रचालक या पदावर काम केले, त्यानंतर पदोन्नती होऊन हार्बर उपकेंद्र, नंतर कुवारबाव उपकेंद्र, मंडणगड उपकेंद्र आणि शेवटी बदली हार्बर सबस्टेशन येथे साडेतीन वर्षे कार्यरत होते.
वीजमंडळात लागल्यापासून श्री. कुलकर्णी फेडरेशन संघटनेत शाखा प्रमुख आणि उपविभागप्रमुख पदावर कार्यरत होते. तळमळीने काम करणारे कुलकर्णी यांना संघटनेने डिव्हिजन सेक्रेटरी, सर्कल सेक्रेटरी, झोन सेक्रेटरी अशी अत्यंत महत्त्वाच्या पदांचे दायित्व देण्यात आले. संघटनेचे पाहिले प्रादेशिक सचिव होण्याचा मान कुलकर्णी यांना मिळणे, हे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावतीच म्हणावी लागेल.
मागील वर्षी प्रशासनाने वीज कंपनीच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून त्यांना उत्कृष्ट यंत्रचालक हा मानाचा पुरस्कार देण्यात आला होता.
‘श्री. कुलकर्णी सेवानिवृत्त होत असल्याबद्दल आनंद आहेच; पण तळमळीने संघटनेचे काम करणारा हाडाचा कार्यकर्ता, एक अनुभवी पदाधिकारी प्रवाहातून बाजूला होणार, याची उणिवही आम्हाला भासणार’, असे मनोगत अनेकांनी व्यक्त केले.