५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्यास १२ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !
सातारा, २९ फेब्रुवारी (वार्ता.) – चॉकलेट देण्याचे आमीष दाखवून ५ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणार्या संतोष आबा भोईटे यांना सातारा जिल्हा सत्र न्यायालयाने १२ वर्षे सश्रम कारावास आणि २० सहस्र रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. याविषयी पीडित बालिकेच्या आईने वाठार पोलीस ठाण्यामध्ये तक्रार प्रविष्ट केली होती.
या तक्रारीचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक निकम यांनी केला. न्यायालयात दोषारोपपत्र प्रविष्ट झाल्यानंतर श्रीमती बोरा यांच्या न्यायालयात हा खटला चालला. सरकार पक्षाच्या वतीने साहाय्यक सरकारी अधिवक्त्या (सौ.) मंजुषा तळवलकर यांनी काम पाहिले. या प्रकरणात एकूण १३ साक्षीदार तपासण्यात आले. या प्रकरणात पीडित मुलगी, फिर्यादी, न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा तज्ञ आणि तपासी अधिकारी या सर्वांकडील पुरावे महत्त्वाचे ठरले. आरोपी संतोष भोईटे यांना दोषी ठरवत पोक्सो अंतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली.