ब्राह्मणांना धमकी दिलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश !
मुंबई विधानसभेतून…
|
मुंबई – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून ‘महाराष्ट्रातील ब्राह्मणांना २० मिनिटांत कापून काढू’ अशी भाषा करणारी व्यक्ती बारामतीशी संबंधित आहे. या व्यक्तीचे नाव योगेश सावंत असून तो शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाशी संबंधित आहे. त्याला अटक केल्यावर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी गटाचे आमदार रोहित पवार यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना संपर्क करून त्याला सोडून देण्यास सांगितले. रोहित यांचा योगेश सावंत याच्याशी संबंध काय ? त्यांनी संपर्क का केला ? हे एक मोठे कारस्थान असून त्याविषयी संबंधित सर्वांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे आमदार राम कदम यांनी विधानसभेत केली. या वेळी विधानसभेचे तालिका अध्यक्ष दीपक चव्हाण यांनी ‘या प्रकरणात योगेश सावंत आणि अन्य कोण आहेत ? त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी’, असे निर्देश दिले.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ‘एखाद्या समाजाविरुद्ध अशी भाषा कुणी करू नये. आम्ही त्यांना पाठीशी घालणार नाही’, असे सांगितले. या वेळी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी ‘या प्रकरणाशी संबंधित ज्या व्यक्ती आहेत, त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असे सभागृहात सांगितले.