वर्ष २०२२-२३ मध्ये ६ प्रमुख राजकीय पक्षांचे एकूण उत्पन्न ३ सहस्र ७७ कोटी रुपये !

भाजपचे एकूण उत्पन्न २ सहस्र ३६१ कोटी रुपये !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ने २८ फेब्रुवारी या दिवशी देशातील ६ राष्ट्रीय पक्षांचे २०२२-२३ या आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न एका अहवालाद्वारे घोषित केले. ते ३ सहस्र ७७ कोटी रुपये असून त्यात भाजपचा वाटा सर्वाधिक आहे. या कालावधीत भाजपचे एकूण उत्पन्न २ सहस्र ३६१ कोटी रुपये होते. हे प्रमाण ६ राष्ट्रीय पक्षांच्या एकूण उत्पन्नाच्या ७६.७३ टक्के इतके आहे. भाजपच्या खालोखाल ४५२.३७५ कोटी रुपयांच्या उत्पन्नासह काँग्रेस दुसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. हे प्रमाण एकूण उत्पन्नाच्या १४.७ टक्के आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त बसप, आप, एन्.पी.पी. (नॅशनल पीपल्स पार्टी) आणि माकप यांनी त्यांचे उत्पन्न जाहीर केले आहे.

या अहवालानुसार,

१. भाजपच्या उत्पन्नात २३.१५ टक्क्यांची म्हणजे ४४३ कोटी रुपयांची वाढ झाली.

२. आम आदमी पक्षाचे उत्पन्न तब्बल ९१.२३ टक्क्यांनी वाढून ते ८५.१७ कोटी रुपये झाले.

३. काँग्रेसचा विचार करता त्याचे उत्पन्न १६.४२ टक्क्यांनी म्हणजे ८८.९० कोटी रुपयांनी वाढले.

राजकीय पक्षांच्या खर्चाचे प्रमाण !

१. भाजप : पक्षाने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये एकूण उत्पन्नाच्या केवळ ५७.६८ टक्के म्हणजे १ सहस्र ३६१ कोटी रुपये खर्च केले.

२. काँग्रेस : याच कालावधीत काँग्रेसने ४६७.१३५ कोटी रुपये खर्च केले. हे त्याच्या उत्पन्नापेक्षा ३.२६ टक्क्यांनी अधिक होते.

३. आप : पक्षाचे एकूण उत्पन्न ८५.१७ कोटी रुपये होते, तर त्याने १०२.०५१ कोटी रुपये म्हणजे एकूण उत्पन्नाच्या १९.८२ टक्के अधिक खर्च केले.