वारंवार होणार्या पेपरफुटीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याची मागणी !
पेपरफुटीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या आमदारांचे विधीमंडळाच्या पायर्यांवर आंदोलन !
मुंबई – राज्यात वारंवार होणार्या पेपरफुटीच्या प्रकरणी विधीमंडळाच्या पायर्यांवर महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केले. यामध्ये १० ते १२ आमदार सहभागी झाले होते. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील इत्यादी आमदार या आंदोलनात सहभागी झाले होते. या आमदारांनी पेपरफुटीच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्याची मागणी केली.
या वेळी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या वेळी म्हणाले की, प्रतिदिन सकाळी पेपरफुटीची बातमी असते. गरीब विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात. त्यांची हानी होते, यामागे मोठे जाळे कार्यरत आहेत. उत्तरप्रदेशमध्ये पेपरफुटीची घटना घडली, तेव्हा तेथील सरकारने सर्व परीक्षा रहित करून कारवाई केली. अशी पावले आपल्या येथे उचलावीत. काही मंत्र्यांच्या लोकांसाठी अशा घटना घडत आहेत, अशी माहिती माझ्या कानावर आली आहे. तसे आहे का ? पेपरफुटीच्या प्रकरणी सरकारने कडक पावले उचलावीत. सरकारने काय पावले उचलली ? तेही समजले पाहिजे.