Goa International DrugRacket Busted गोव्यातून कार्यरत असलेले अमली पदार्थ व्यवसायाचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त !
|
पणजी, २९ फेब्रुवारी (वार्ता.) : महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स – ‘डी.आर्.आय.’च्या) मुंबई आणि गोवा विभागांच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे कारवाई करत गोव्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेले अमली पदार्थ व्यवसायाचे जाळे उद्ध्वस्त केले आहे. या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या नायजेरियन नागरिकाला हणजूण येथील जंगलात २० मिनिटे पाठलाग करून कह्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ३९ ग्रॅम कोकेन आणि बेहिशेबी ६ लाख रुपये रोख रक्कम कह्यात घेतली आहे, अशी माहिती ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्यांनी २९ फेब्रुवारी या दिवशी दिली.
१. अन्वेषणातून मिळालेल्या माहितीनुसार हा नायजेरियन नागरिक भारतात गेली कित्येक वर्षे अनधिकृतपणे वास्तव्य करून गोव्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावर अमली पदार्थांचा व्यवसाय करत होता. या नायजेरियन नागरिकाला यापूर्वी २ वेळा कह्यात घेण्यात आले होते. (हे गोवा पोलिसांना लज्जास्पद ! नायजेरियन नागरिकाला आधी कह्यात घेतले, तेव्हाच नीट अन्वेषण केले असते, तर आतापर्यंत फोफावलेला अमली पदार्थ व्यवसाय आणि व्यसनाधीनता यांना आळा बसला असता ! – संपादक)
२. ‘डी.आर्.आय.’ने जानेवारी २०२४ मध्ये विदेशातून भारतात अमली पदार्थांची तस्करी करणार्या थायलँडमधील महिलेला मुंबईत कह्यात घेतले होते. या प्रकरणी सविस्तर अन्वेषण केल्यानंतर गोव्यात वास्तव्यास असलेला नायजेरियन नागरिक अमली पदार्थांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करत असल्याची माहिती ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्यांना मिळाली.
३. ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्यांनी गोव्यात सुमारे एक महिना संबंधित नायजेरियन नागरिकावर देखरेख ठेवली असता तो गोव्यात हणजूण येथे वास्तव्यास असल्याचे समजले. ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्यांनी १९ फेब्रुवारीला नायजेरियन नागरिकाला कह्यात घेण्यासाठी कारवाई चालू केली. कारवाईची कुणकुण लागल्यानंतर नायजेरियन नागरिकाने हणजूण येथील जवळच्या जंगलात पळ काढला. ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्यांनी पाठलाग करून त्याला पकडले.
संशयित नायजेरियन नागरिकाने तो भारतभर अमली पदार्थ व्यवसाय करत असल्याचे, तसेच गोव्यातील अमली पदार्थ व्यावसायिक आणि ग्राहक यांनाही तो अमली पदार्थ पुरवत असल्याचे मान्य केले आहे. संबंधित नायजेरियन नागरिकाला मुंबई येथील न्यायालयात उपस्थित करून त्याला न्यायालयीन कोठडी ठोठावण्यात आली आहे.
संपादकीय भूमिकाभारतात अवैधपणे विदेशी नागरिकांना वास्तव्य करू देणार्या आणि कसून चौकशी न करता त्यांना सोडणार्या संबंधित पोलिसांवरही कारवाई होणे आवश्यक ! |