मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी आणि शिक्का वापरल्याची गोष्ट गंभीर ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
कुणालाही पाठीशी घालणार नाही !
मुंबई, २९ फेब्रुवारी (वार्ता.) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बनावट स्वाक्षरी आणि बनावट शिक्का असलेली काही निवेदने समोर आली असून त्याची राज्यशासनाने गांभीर्याने नोंद घेतली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचे अन्वेषण चालू आहे. या प्रकरणी कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २९ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत दिली. याविषयी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत सूत्र उपस्थित केले होते.
ही निवेदने सचिवालयात कार्यवाहीसाठी आल्याचे मुख्यमंत्री सचिवालयातील अधिकारी, कर्मचारी यांना आढळून आले होते.
मुख्यमंत्री कार्यालयात ८ मास तोतया अधिकारी ! – विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते
मुख्यमंत्री कार्यालयात मुख्यमंत्र्यांच्या खोट्या स्वाक्षर्या, शिक्क्याची प्रकरणे होतात, हे गंभीर आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री कार्यालयात यापूर्वीही विशेष कार्यकारी अधिकारी ६ मास तोतया म्हणून कार्यरत होता. राज्याचा कारभार ज्या ठिकाणाहून चालतो त्या मंत्रालयातच, तसेच मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानामध्ये राजरोसपणे ‘तोतया विशेष कार्यकारी अधिकारी’ म्हणून वावरत होता. इतकेच नव्हे, तर त्या तोतयाने ८ मास अनेक अधिकार्यांचे स्थानांतरही केले आहे. कर्मचार्यांचे स्थानांतर आणि शासकीय दस्तऐवज यांमध्ये तो हस्तक्षेप करत होता. स्वतः धारिका घेऊन मुख्यमंत्र्यांकडे जाऊन स्वाक्षरी घेऊन यायचा. तो खरा आहे कि खोटा विशेष कार्यकारी अधिकारी आहे, हेही मुख्यमंत्र्याना माहीत नव्हते. ही अतिशय दुर्दैवी आणि चिंतेची गोष्ट आहे. हा सर्व गोंधळ पहाता राज्यात किती मोठ्या प्रमाणात अनागोंदी चालू आहे, हे सर्व जनतेला दिसत आहे.