यवतमाळ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ !
यवतमाळ – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ फेब्रुवारी या दिवशी विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ करण्यात आला. पंतप्रधान किसान सन्मान निधीअंतर्गत देशातील ९ कोटी शेतकरी कुटुंबांना एकूण २१ सहस्र कोटी रुपये आणि महाराष्ट्रातील विविध योजनांच्या लाभार्थ्यांना सुमारे ६ सहस्र ९०० कोटी रुपयांचे वितरण, तसेच राज्यातील सुमारे ५ सहस्र कोटी रुपये निधीतून रस्ते, रेल्वे आणि सिंचन प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमीपूजन, तसेच यवतमाळ येथील पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचे अनावरणही मोदी यांच्या हस्ते या वेळी करण्यात आले.
ग्रामीण विकासासाठी ‘हर घर जल’, ‘पी.एम्. किसान निधी’, ‘लखपती दीदी योजना’, स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण आदी विविध योजनांची कार्यवाही करण्यात येणार असल्याचा उल्लेख या वेळी करण्यात आला.
पंतप्रधानांच्या हस्ते वरोरा-वणी महामार्गावरील १८ कि.मी. चौपदरीकरण, सलाईखुर्द-तिरोरा महामार्गावरील काँक्रिटीकरण, साकोली-भंडारा जिल्हा सीमेपर्यंतच्या दुपदरी रस्त्याचेही लोकार्पण, वर्धा-कळंब रेल्वे मार्ग या टप्प्याचे लोकार्पण, नवीन रेल्वे गाडीचा शुभारंभ, न्यू आष्टी-अंमळनेर रेल्वे, अंमळनेर-न्यू आष्टी स्टेशनपर्यंत विस्तारित रेल्वेसेवेचा शुभारंभ, इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभ, पी.एम्. किसान सन्मान निधीच्या १६ व्या हप्त्याचे थेट बँक खात्यात वितरण, नमो शेतकरी महासन्मान निधी अंतर्गत दुसर्या आणि तिसर्या हप्त्याचे वितरण, १ कोटी ‘आयुष्मान कार्ड’चे वितरण, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत महिला बचत गटांना फिरत्या निधीचे वितरण, पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत विदर्भ आणि मराठवाडा येथील ६ प्रकल्पांचे लोकार्पण, बळीराजा जलसंजीवनी योजनेअंतर्गत विदर्भ आणि मराठवाडा येथील ४५ सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण, रस्त्यांचे लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजनेचा शुभारंभही झाला. त्यात येत्या ३ वर्षांत १० लाख घरे बांधण्यात येणार आहेत. अडीच लाख लाभार्थ्यांना त्यातील पहिल्या हप्त्याचे ऑनलाईन वितरण करण्यात आले.