गडांच्या जतन आणि संवर्धनाकरता निधीची तरतूद हवी !
ठाकरे गटाचे आमदार डॉ. राजन साळवी यांनी दिले उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन
रत्नागिरी – चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आमदार डॉ. राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडासह राज्यातील सर्व गडांच्या जतन आणि संवर्धनाकरता निधी उपलब्ध होण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले.
जयगड येथील जयगडाचा बुरुज आणि तट यांना तडे गेल्याचे निदर्शनास आले असता आमदार डॉ. राजन साळवी यांनी जयगडाची पहाणी केली होती. त्या वेळी गडाच्या दुरवस्थेविषयी अधिवेशनात लक्षवेधी मांडणार असल्याचे सांगितले होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला त्यामध्ये त्यांनी गड जतन आणि संवर्धनाकरता निधी उपलब्ध केला जाईल, असे आश्वासित केले. त्या अनुषंगाने आमदार डॉ. राजन साळवी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडासह राज्यातील सर्व गडांच्या जतन आणि संवर्धनाकरता निधीची तरतूद करण्याविषयी निवेदन दिले.