संपादकीय : फुटीरतावादी द्रमुक !
पाश्चात्त्य, इस्लाम आणि साम्यवाद या ३ महाशक्तींचे त्रिकूट भारताला जर्जर करण्यासाठी येनकेन प्रकारेण प्रयत्न करत आहे. बंगालमधील संदेशखाली येथील संतापजनक घटना त्याचे एक उदाहरण ! तृणमूल काँग्रेसच्या बंगालमध्ये ज्याप्रकारे हिंदूंची ससेहोलपट आणि राष्ट्रद्रोही घटनांना ऊत आला आहे, तसाच प्रकार द्रमुक (द्रविड प्रगती संघ) सत्तेत असलेल्या तमिळनाडूतही दृष्टीपथात पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तमिळनाडूतील कुलशेखरपट्टणम् येथे इस्रोच्या नवीन प्रक्षेपण केंद्राच्या पायाभरणीसाठी आले होते. तेव्हा या कार्यक्रमाप्रीत्यर्थ राज्य सरकारने बनवलेल्या विज्ञापनात चीनचा राष्ट्रध्वज रॉकेटच्या टोकावर दाखवण्यात आला होता. साधा तर्क केला, तरी येथे चीनचा विषय उद्भवत नाही. यामुळे हे स्पष्ट आहे की, द्रमुकचे हे विज्ञापन त्याचे चीनप्रेम दर्शवणारे आहे.
चीनधार्जिणी काँग्रेस !
द्रमुकमध्ये हिंदुद्वेष भिनलेला आहे. गेल्या अनेक दशकांपासून ब्राह्मणद्वेषाच्या आडून येथील द्रविड चळवळीने हिंदु धर्माला पोखरण्याचा प्रयत्न चालवला. गेल्या काही दशकांत ‘पेरियार’ यांच्या नेतृत्वाखाली हिंदुविरोधी कथानकाने तेथे भयावह रूप धारण केले आणि तमिळनाडूला हिंदु धर्मापासून विलग करण्याचे प्रयत्न केले. सप्टेंबर २०२३ मध्ये मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला मलेरिया, कोरोना आणि डेंग्यू या आजारांच्या रांगेत बसवून त्याला नष्ट करण्याचे वक्तव्य केले होते. त्याला काँग्रेसकडून समर्थन मिळाले. लक्षात घ्या, या घटनेच्या दोन मासांपूर्वी केंद्र सरकारविरोधी ‘इंडी’ आघाडीची स्थापना झाली होती. त्यामुळे इंडीचा महत्त्वाचा घटक असलेल्या द्रमुकच्या या भूमिकेमुळे अवघ्या २ मासांत या आघाडीचे हिंदुद्वेष्टे रूप स्पष्ट झाले. काँग्रेसला राजस्थान आणि छत्तीसगड या महत्त्वाच्या विधानसभांमधून पायउतार होण्यामागे हाच पाठिंबा भोवला.
आताही ‘इस्रो’ केंद्राच्या पायाभरणीच्या निमित्ताने केलेल्या ‘द्रमुक’च्या विज्ञापनातून या राष्ट्रद्रोही धोरणाची री ओढण्यात आली आहे. येथे गंमत पहा ! ‘भारताला जोडा’यला निघालेल्या काँग्रेसला भारताला प्रातिनिधिक रूपात का असेना, तोडायला निघालेल्या लोकसभेतील त्याच्या सर्वांत मोठ्या सहकारी ‘द्रमुक’ पक्षाच्या कृत्याकडे पहायला वेळ नाही. सध्या काँग्रेसींचे ‘जननायक’ राहुलजी यांची यात्रा उत्तरप्रदेशातील जनतेला स्वत:च्या गटात ओढण्यासाठी सज्ज झाल्याने काँग्रेसची शक्ती आता तेवढीच शिल्लक राहिली आहे कि काय ? मुळात काँग्रेसचे ऐतिहासिक चीनप्रेम लपून राहिलेले नाही. वर्ष २००८ मध्ये काँग्रेस आणि ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना’ या दोन्ही पक्षांमध्ये सामंजस्य करार झाला होता. त्याला सार्वजनिक करण्याच्या मागण्यांना काँग्रेसने नेहमीच कचर्याची टोपली दाखवली. ‘राजीव गांधी फाऊंडेशन’ला चीन सरकारकडून देणग्या दिल्याचे उघड झाले. त्यामुळे काँग्रेस द्रमुकच्या कृत्यावर पांघरूण घालून पुन्हा एकदा तिच्यातील चीनप्रेमाचे दर्शन घडवत आहे. चीनधार्जिण्या काँग्रेसला भारतीय जनता मात्र विसरणार नाही, हे तिने लक्षात ठेवले पाहिजे.
फेब्रुवारीच्या आरंभी काँग्रेसचे कर्नाटकातील खासदार डी.के. सुरेश यांनी भारताच्या अखंडत्वाला सुरुंग लावणारे विधान केले. ते म्हणाले की, दक्षिण भारतीय राज्यांना केंद्र सरकारकडून विशेष साहाय्य मिळत नाही. उत्तर आणि दक्षिण भारतीय राज्यांमध्ये भेदभाव होत असल्याचे सांगत त्यांनी चिथावणी दिली होती की, दक्षिण भारताला मुख्य भारतापासून वेगळे करण्याची आवश्यकता आहे. पंतप्रधानांनी तमिळनाडूच्या त्यांच्या वरील दौर्यात राज्याला १७ सहस्र कोटी रुपयांच्या नव्या प्रकल्पांची भेट दिली. मुळात राजकारण त्याच्या ठिकाणी आहे; परंतु देशाला तोडण्याची भाषा करणार्या या लोकांना जनता विसरणार नाही.
भारत तोडण्याचा कट ?
चीनप्रेमी विज्ञापनाच्या घटनेपुरतेच या प्रकाराला पाहून उपयोगाचे नाही. यामागे मोठा कट शिजत आहे. आपण प्रवाहाच्या उलटे चालायला लागलो, तर वारा आपल्याला विरोध करतो. धावायला लागलो, तर याच वार्याचा प्रचंड विरोध होतो. सध्या भारतात सांस्कृतिक राष्ट्रनिष्ठेच्या चळवळीने जोर धरला आहे. भारतीय स्वत:ची ‘हिंदु’ ओळख काही प्रमाणात का असेना, प्रदर्शित करू लागले आहेत. केंद्रशासनाने जिहादी आतंकवाद, खलिस्तानी, नक्षलवाद आदींचा बीमोड करण्यासाठी कंबर कसली आहे. या परिस्थितीमुळे भारतविरोधी शक्तींना अजीर्ण झाले आहे. या राष्ट्रविघातक शक्ती सर्व स्तरांतून भारत, भारत सरकार आणि भारतीय यांना विरोध करत आहेत. अमेरिका, कॅनडा आणि आता ब्रिटनच्या संसदेतून भारताला अत्याचारी दाखवण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे, तो याच ‘टूलकिट’चा भाग ! काश्मीर आणि पंजाब यांना भारतापासून विलग करण्यासाठी चीनच्या साहाय्याने पाकिस्तान कट रचत आहे. या सर्वांत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चीनला हाताशी धरून दक्षिणेतील भारतविरोधी शक्ती फुटीरतेची बिजे पेरत नसतील, हे कशावरून ? तमिळनाडूजवळ असलेल्या मालदीवला वशीकृत करून चीनने त्याला स्वत:च्या खिशात घातले आहे. शेजारील श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष रानिल विक्रमसिंघे यांनी स्वत:ला भारत अथवा चीन कुणाच्याही बाजूने नसल्याचे वेळोवेळी स्पष्ट केले असले, तरी धूर्त चीनच्या कर्जाखाली मात्र श्रीलंका दबलेला आहे. द्रमुक तमिळनाडूला भारतापासून विलग करण्यासाठी बीज रोवत आहे का, असे म्हणणे तसे धाडसाचे ठरेल; परंतु या प्रातिनिधिक घटनेकडे त्या गांभीर्याने पहाणे आवश्यक आहे. दक्षिण भारतात फुटीरतावादाला समर्थन मिळण्याआधीच अशा राष्ट्रविघातक शक्तींची नांगी ठेचली गेली पाहिजे. यासाठी गुप्तचर यंत्रणांनी बारकाईने लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे. काश्मीर, पंजाब, अरुणाचल प्रदेश आणि बंगाल यांनंतर आता तमिळनाडू ही भारतासाठी नवीन युद्धभूमी ठरू नये, एवढेच !
द्रमुकने जरी या विज्ञापनात चूक झाल्याचे नंतर मान्य केले असले, तरी त्याच्या नेत्या कनिमोळी यांनी ‘भारताने चीनला शत्रूराष्ट्र घोषित केलेले नाही’, अशा प्रकारे संतापजनक विधान केले आहे. याचे समर्थन करतांना त्यांनी वर्ष २०१९ मध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी यांची भेट तमिळनाडूतील महाबलीपूरम् या प्राचीन ठिकाणी ठेवण्यात आल्याचा दाखला दिला. या वक्तव्यावर हसावे कि रडावे समजत नाही. गेल्या ४ वर्षांत पुष्कळ पाणी डोक्यावरून गेले आहे. या भेटीनंतर डोकलाममध्ये उभय देशांच्या सैनिकांमध्ये संघर्ष झाला. लडाखमध्ये चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. भारताचे परराष्ट्र धोरण माहिती नसणे एवढ्या कनिमोळी दूधखुळ्या नाहीत. एकूणच द्रमुककडून हे विज्ञापन जाणीवपूर्वक करण्यात आले. या चीनप्रेमाची किंमत मोजावी लागेल, हे फुटीरतावादी द्रमुक आणि काँग्रेस यांना लक्षात असू द्यावे, एवढेच !
भारताचे तुकडे पाडू पहाणारे चीनप्रेमी द्रमुक आणि काँग्रेस यांना त्याची किंमत मोजावी लागेल, हे त्यांनी विसरू नये ! |