हिंदु राष्ट्राची उभारणी !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
१. हिंदु राष्ट्राची उभारणी केवळ आधिभौतिक स्तरावरची नसून तिला सनातन धर्माचे अधिष्ठान असणे
‘सनातन धर्माचे अधिष्ठान असलेली, हिंदु राष्ट्राची उभारणी ही केवळ आधिभौतिक स्तरावरची कधीच नव्हती आणि तशी कधीही होऊ नये. तिने अमेरिकेचे वाकडे वळण घेऊ नये. जगातील सगळेच विचारवंत चिरंतन तत्त्वे आणि मूल्ये यांचा पाठपुरावा करायला सांगतात. चिरंतन मूल्यांचा ध्यासच घ्यायचा असेल, तर आमची श्रुति, स्मृति, पुराणादि शास्त्रे, आमच्या परंपरा, आमच्या निष्ठा यांचा मूलभूत विचार आणि त्याला अनुरूप अशा शक्तीनुसार अनुष्ठान आवश्यक आहे.
२. सनातन मूल्यांचा विसर पडल्याचा परिणाम
सनातन मूल्यांचा विसर पडल्यामुळेच मद्यप्राशन, व्यसनासक्ती, भ्रष्टाचार, आत्मकेंद्रीत वृत्ती, प्रसिद्धीची प्रचंड हाव (लोकेषणा), धनपरायणता (पैशांच्या मागे धावणे), शुष्कवाद असे हे अनंत दुर्गुण उसळ्या मारत आहेत.
३. सनातन धर्माची प्रतिष्ठा असलेल्या भरतखंडात धर्मनिरपेक्षतेने बेधुंद धिंगाणा घालणे
या बेधुंद अशा ‘सेक्युलर’शाहीने (धर्मनिरपेक्षतेने) धिंगाणा घातला आहे, पावलोपावली सुरुंग पेरले आहेत. त्यामुळे सनातन धर्माची प्रतिष्ठा असलेल्या या भरतखंडात दुर्भाग्याने आज कोणत्याही चांगल्या उपक्रमास जिवाभावाची माणसे मिळत नाहीत. या भारताचे दुर्दैव असे की, सैन्यदलातही हव्या त्या क्षमतेची माणसे आज मिळत नाहीत. लक्षावधी वर्षांपासून विश्वाची प्रतिष्ठा असलेला धर्मज्वलंत अशा भारत देशात असे का घडावे ?
४. सनातन हिंदु संस्कृतीच्या चिरंतन तत्त्वांच्या आधाराविना समृद्ध जीवन जगता न येणे
आजचे गोंधळलेले, भांबावलेले, दिशाहीन जगसुद्धा चिरंतन तत्त्वांचा आधार घेऊनच, त्याला अनुसरणारी शास्त्रशुद्ध अशी आखणी प्रतिपादित करणार्या सनातन विचारसरणीच्या शोधात आहे. त्यांना या सनातन हिंदु संस्कृतीच्या चिरंतन तत्त्वांच्या आधाराविना समृद्ध जीवन जगताच यायचे नाही.
५. सनातन धर्माचे वीर उभे राहिल्यावरच हिंदु राष्ट्र उत्कर्षाला जाऊन जगाचेही कल्याण होणार असणे
अशा काळात ‘सनातन धर्म’ आणि ‘संस्कृती’ यांचा उद्घोष करून अभ्युदय आणि निःश्रेयस यांच्या प्राप्तीकरता, तळहातावर शीर घेऊन वीर व्रत अनुसरणारे लोक उभे रहातील, त्याच दिवशी हे राष्ट्र उत्कर्षाला जाईल अन् जगाचेही कल्याण साधले जाईल.
हिंदुस्थानच्या आणि जगातील सुबुद्ध जनतेला आवाहन आहे की, ही प्रचंड लाट थोपवून धरण्याचा उद्योग तुम्हा-आम्हा सर्वांना करावयाचा आहे !’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२३)