भारताची स्वतःची विज्ञान आणि तंत्रज्ञान परंपरा होती का ? असल्यास तिचे काही आधार आहेत का ?
प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी लेखमाला !
‘दुर्दैवाने याविषयी आपण (आपले शास्त्रज्ञ) अजून फारसा विचार करतांना दिसत नाहीत. काही सन्माननीय अपवाद वगळता त्यांची सर्व धडपड पाश्चात्त्यांचे अनुकरण करण्यातच धन्यता मानण्यात आहे. ‘भारताची स्वतःची विज्ञान-तंत्रज्ञान परंपरा ही आपली बुद्धी थक्क होईल’, अशी सर्वश्रेष्ठ आहे. त्याचे अनेक आधारही उपलब्ध आहेत. याविषयी सहस्रावधी पाने लिहिली, तरी न्यून पडतील, अशी अवस्था आहे, तरी थोडक्यात काही विशेष मुद्यांचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करू.
आज विज्ञान-तंत्रज्ञानाची प्रगती डोळे दिपवणारी असली, तरी प्राचीन भारतीय ज्ञान परंपरेतील अनेक शाखांचा विचारही आजच्या (तथाकथित) प्रगत विज्ञानात दिसत नाही, उदाहरणार्थ परवा परवापर्यंत मानसशास्त्राला विज्ञानशाखेत स्थान नव्हते. आता त्या शाखेला मान्यता मिळाली. आपल्याकडे (हिंदु धर्मामध्ये) अंत:करणाचे ४ प्रकार सांगितले आहेत. त्यातील मन आणि बुद्धी या दोन अंशांचा विज्ञान विचार करू लागले आहे. चित्त आणि अहंकार या तुलनात्मक अधिक अव्यक्त गोष्टी आजच्या विज्ञानाच्या कक्षेत नाहीत. सप्तद्वीपात्मक भूलोकातील पृथ्वी जंबुद्वीपाखेरीज अन्य ६ द्वीपे आपल्याला अद्यापही सापडलेली नाहीत.
१. महाभारतातील संजयची दृष्टी अधिक प्रगत !
दुसरीकडे काही भाविक विज्ञानवादी प्राचीन गोष्टींची सांगड आधुनिक तंत्राशी घालतांना दिसतात; परंतु हे उचित नाही; कारण आपल्याकडील गोष्टी अधिक प्रगत होत्या. उदाहरणार्थ नेहमी म्हटले जाते की, महाभारतातील संजयची दृष्टी म्हणजे आजचे दूरदर्शन (टेलिव्हिजन); पण हे योग्य नाही; कारण संजयचे सामर्थ्य दूरदर्शनपेक्षा अधिक श्रेष्ठ असे होते. आज दूरचित्रवाणीवर शेकडो वाहिन्या (चॅनल्स) आपण पाहू शकतो; पण एखाद्या वाहिनीवर काय पहायचे ? याचे स्वातंत्र्य आपल्याला नाही. ते जे दाखवतील, ते निमूटपणे पहाणे आपल्या हातात उरते. संजयच्या शक्तीचे वैशिष्ट्य, म्हणजे ते द्रष्ट्याच्या इच्छेप्रमाणे पहाण्याचे स्वातंत्र्य असणारे सामर्थ्य होते.
२. क्षेपणास्त्र आणि मंत्रसामर्थ्यावरील अस्त्र यांतील महत्त्वपूर्ण भेद
अस्त्रविद्या म्हणजे ‘मिसाईल्स’ (क्षेपणास्त्र) नव्हेत. प्रक्षेपित केलेले ‘मिसाईल’ आवरता येत नाही. अस्त्र प्रक्षेपित केल्यानंतरही त्याचा उपशम (थांबवणे) करता येत होता. अनेक ठिकाणी तसे स्पष्ट उल्लेख आहेत. अस्त्र ही स्थिरबुद्धीच्या माणसाला त्याचे परीक्षण करूनच दिली जात होती. उतावळ्या स्वभावाच्या माणसाला अस्त्र देत नव्हते. आज ‘मिसाईल्स’ आतंकवाद्यांनाही मिळू शकतात. त्याचा परिणाम आपण अनुभवतो आहोत. याखेरीज अस्त्रासाठी ‘मिसाईल्स’प्रमाणे विशेष अशा भौतिक पदार्थांची आवश्यकता नसते. केवळ मंत्रशक्तीच्या बळावर अस्त्र सिद्ध होत असे.’
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर, १९९८)