सांगलीतील गोरक्षक अंकुश गोडसे यांची ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड !
सांगली – गेल्या २० वर्षांहून अधिक काळ जिवावर उदार होऊन गोरक्षणाचे कार्य करणारे सांगली येथील गोरक्षक श्री. अंकुश गोडसे यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र प्राणी कल्याण कायदा संनियंत्रण समिती’ ही शासनाची असून त्या समितीद्वारे ही निवड करण्यात आली आहे. याच समवेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने त्यांना ‘सांगली मनपा गोसेवा शहरप्रमुख’ म्हणूनही दायित्व देण्यात आले आहे.
श्री. अंकुश गोडसे हे ‘अखिल भारत कृषी गोसेवक संघा’च्या वतीने कार्यरत असून त्यांनी आजपर्यंत शेकडो गायींचे प्राण वाचवले आहेत. विविध गोशाळांना गोमूत्र संयत्र बसवून देण्याचे काम ते करतात. परिसरातील आजारी गोमातांची सेवा करणे, विविध गोशाळांना चारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, अशा सेवांमध्येही त्यांचा सहभाग असतो. श्री. अंकुश गोडसे हे ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’च्या माध्यमातून हिंदुत्वाचे कार्य करतात, तसेच हिंदु जनजागृती समितीच्या विविध उपक्रमांमध्येही त्यांचा सहभाग असतो.