पूर्णवेळ साधना करण्यासाठी साधिकेच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया
१. आरंभी एक कृती म्हणून साधनेचे प्रयत्न करणे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा सत्संग लाभल्यावर साधनेला प्राधान्य देणे, ‘सनातनचे ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सत्संग’ या माध्यमांतून गुरुदेवांप्रती श्रद्धा बळकट होणे
गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने वर्ष २०२० पासून मी व्यष्टी आणि समष्टी साधना चालू केली. तेव्हा माझी साधना एक कृती म्हणून होत असे. वर्ष २०२१ मध्ये मला प्रथमच गुरुदेवांशी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्याशी) बोलण्याची संधी मिळाली. तेव्हापासून मी साधनेला प्राधान्य देण्याचा प्रयत्न केला. माझे साधनेचे अपेक्षित असे प्रयत्न होत नसतांनाही ‘सनातनचे ग्रंथ, दैनिक ‘सनातन प्रभात’ आणि सत्संग’ या माध्यमांतून गुरुदेवांवरील श्रद्धा बळकट होत गेली. त्यातूनच मला लहान सहान प्रयत्न करण्याची गोडी लागली आणि मला अनुभूतीही येऊ लागल्या.
२. आश्रमातील साधकांप्रमाणे साधना करण्याची प्रेरणा मिळणे
मला सेवेनिमित्त किंवा अन्य कारणास्तव आश्रम किंवा सेवाकेंद्र येथे जाण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘तेथील साधकांची तळमळ आणि त्यांच्या अनुभूती ऐकून मीही झोकून देऊन साधना करायला हवी’, असे मला वाटत असे; मात्र तसा माझा ठाम निश्चय होत नव्हता. माझ्याकडून ‘शिक्षण सांभाळून सेवा करीन’, असा विचार होऊ लागला.
३. वडिलांनी पूर्णवेळ साधना करायला प्रोत्साहन देणे
माझी साधनेची आवड पाहून माझ्या बाबांनी (श्री. दीपक छत्रे यांनी) मला सांगितले, ‘‘तुला आवड आहे, तर तू साधना कर. माझी अन्य काहीच अपेक्षा नाही. मी तुला गुरुदेवांना अर्पण केले आहे. तेच तुला पुढील मार्ग दाखवू शकतात.’’
४. एका नातेवाइकांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास सांगितल्यावर पूर्णवेळ साधना करण्याविषयी मनात संभ्रम निर्माण होणे
आमचे एक नातेवाईक मला सांगत असत, ‘‘ तू असा निर्णय का घेतेस ? तू आधी आर्थिकदृष्ट्या सक्षम हो. नंतर तुझे तू पाहू शकतेस.’’ यामुळे माझ्या मनात ‘माझा संस्थेवर भार पडेल का ?’, असा विचार येऊ लागला.
५. साधना करण्याविषयी मनाची द्विधा स्थिती होणे आणि भक्तीसत्संगातील सूत्रे आठवून ‘गुरूंनी भार उचलला, तर उद्धारच होणार आहे’, याची जाणीव होणे
माझी द्विधा स्थिती असल्यामुळे मला काही सुचेनासे झाले. मला वाटत होते, ‘साधनेत जो आनंद आहे, तो कोणतीच पदवी प्राप्त केल्यावर किंवा पदावर कार्यरत असतांना नाही; मात्र मी काहीही आर्थिक साठा केला नसतांना हा निर्णय घेणे योग्य आहे का ?’
तेव्हा मला भक्तीसत्संगातील सूत्रे आठवू लागली. त्यातून मला दृष्टीकोन मिळाला, ‘आपण गुरूंवर भार सोडला की, ते आपली सर्वतोपरी काळजी घेतात. पैसे आणि नातेवाईक यांना मर्यादा आहेत; मात्र गुरूंनी आपला भार उचलला, तर आपला उद्धारच होणार आहे.’ मला वाटले, ‘मी स्वतःहून काही निर्णय न घेता मार्गदर्शन घेणे योग्य आहे.’ माझ्याकडून गुरुदेवांचा सतत धावा होऊ लागला आणि ‘मला लवकर तुमच्याजवळ न्या’, अशी प्रार्थना होऊ लागली.
६. गुरूंनी आश्वस्त केल्यावर पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय करणे
एकदा गुरुदेवांच्या कृपेने मला त्यांचा सत्संग लाभला. मी गुरुदेवांना आत्मनिवेदन केल्यावर ते म्हणाले, ‘‘संस्थेवर भार कशी होशील ? देव देतो ना संस्थेला !’’ त्यांच्या या एका वाक्याने माझ्या मनातील विचारांचे युद्ध संपले. ‘गुरूंनी मला स्वीकारले आहे’, या विचाराने माझी पुष्कळ भावजागृती झाली आणि मी पूर्णवेळ साधना करण्याचा निश्चय केला.
‘गुरुदेवांच्या कृपेने मला साधनेचा योग्य मार्ग मिळाला आणि त्यांच्या चरणांपाशी येता येत आहे’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. अवनी छत्रे, रायंगिनी, बांदोडा, फोंडा, गोवा. (९.८.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |