महाविद्यालयात तंत्र आणि अभियांत्रिकी यांचे विषय मराठीत शिकता येणार !
|
मुंबई – विधान परिषदेत ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४’ संमत करण्यात आले. या विधेयकानुसार विद्यार्थ्याला तंत्र आणि अभियांत्रिकी शिक्षण मराठीत मिळणार असून तो मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उत्तरे लिहू शकणार आहे. तंत्रशिक्षण आणि अभियांत्रिकी, विज्ञान यांची मराठीत पुस्तके सिद्ध आहेत. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानेे शिक्षक इंग्रजीत बोलले, तरी विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेत समजेल, अशी प्रणाली विकसित केली आहे, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी विधान परिषद सभागृहात सांगितले.
पाटील यांनी पुढे सांगितले की,
१. मराठीत शिक्षण मिळण्यासाठी एक संगणकीय प्रणाली बनवली आहे. या संगणकीय प्रणालीवर आयआयटीने संशोधन पूर्ण केले आहे आणि ‘प्रणाली चांगली आहे’, हे सिद्ध झाले आहे. विद्यार्थी मराठीत भाषेतील पुस्तके वाचून महाविद्यालयात जाऊ शकतो.
२. मराठीत शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी संशोधन केले पाहिजे. त्याला मातृभाषेत विषय चांगल्या प्रकारे समजतो. ‘पॉलिटेक्निकल’च्या २७ सहस्र मुलांनी मराठीत पेपर लिहिला आहे.
३. विद्यार्थी ‘पॉलिटेक्निकल’ अभ्यासक्रमाची ४ वर्षांची पदवी पूर्ण करील, तेव्हा त्याला २-३ भाषांचे ज्ञान होईल. हा ३ मासांचा ‘कोर्स’ असणार आहे, असे चंद्रकात पाटील यांनी सांगितले.
या वेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सांगितले की, मराठीचा वापर केवळ एकाच विद्यापिठापुरता नव्हे, तर सर्वच विद्यापिठांमध्ये व्हावा. राज्यात केंद्रशासनाची जी कार्यालये आहेत, तेथेही मराठीचा उपयोग व्हावा.