India Slams Pakistan In UN : आतंकवाद्यांना आश्रय देणार्या देशाकडे आम्ही लक्ष देत नाही ! – अनुपमा सिंह, संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या सचिव
भारताने संयुक्त राष्ट्रांत काश्मीरवरून पाकला सुनावले !
न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या ५५ व्या सत्राच्या उच्चस्तरीय विभागात भारताने पाकिस्तानला काश्मीर प्रश्न उपस्थित केल्यावरून सुनावले. भारताच्या संयुक्त राष्ट्रांतील सचिव अनुपमा सिंह यांनी पाकला सुनावतांना म्हटले की, जगभरातील आतंकवाद्यांना आश्रय देणार्या देशाकडे आम्ही अधिक लक्ष देऊ शकत नाही. पाकिस्तान लाल रंगात (रक्तात) बुडालेला देश आहे. त्यांचे सरकार त्यांच्या हिताचे काम करण्यात अपयशी ठरल्याची लाज त्यांच्याच लोकांना वाटते.
अनुपमा सिंह यांनी मांडलेली सूत्रे
१. ज्या देशात अल्पसंख्यांकांवर अत्याचार करणार्या संस्था आहेत आणि ज्यांचे मानवी हक्कांचे विक्रम खरोखरच वाईट आहेत, त्या देशाला भारताविरुद्ध विधाने करण्याचा अधिकार नाही.
२. पाकिस्तानने वारंवार भारताचा उल्लेख केला. परिषदेच्या व्यासपिठावर भारताविषयी उघडपणे खोटे आरोप केले जात आहेत, हे अत्यंत निराशाजनक आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत.
३. जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात सामाजिक अन् आर्थिक विकास सुनिश्चित करण्यासाठी भारत सरकारने घटनात्मक प्रयत्न केले आहेत. या भारताच्या अंतर्गत गोष्टी आहेत आणि त्यात कुणाचाही हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही.
४. ऑगस्ट २०२३ मध्ये पाकिस्तानातील जरनवाला शहरात अल्पसंख्यांक ख्रिस्ती समुदायावर अत्याचार करण्यात आले. या काळात १९ चर्च नष्ट करण्यात आली, तर ८९ ख्रिस्त्यांची घरे जाळण्यात आली.
(सौजन्य : Republic World)
तुर्कीयेलाही सुनावले !
तुर्कीयेनेही परिषदेत काश्मीरचे सूत्र उपस्थित केले होते. पाकिस्तानवर टीका करत असतांनाच भारताने तुर्कीयेला ‘भारताच्या अंतर्गत गोष्टींमध्ये हस्तक्षेप करू नये’, अशा शब्दांत सुनावले.