Geert Wilders Death Threat : गीर्ट विल्डर्स यांच्या हत्येसाठी फतवा काढणार्‍या पाकिस्तानच्या २ नागरिकांवर  नेदरलँड्समध्ये आरोप निश्‍चित !

नेदरलँड्सचे भावी पंतप्रधान गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – नेदरलँड्सच्या न्यायालयाने २ पाकिस्तानी नागरिकांवर देशाचे भावी पंतप्रधान आणि इस्लामी कट्टरतावाद्यांचे विरोधक गीर्ट विल्डर्स यांच्या हत्येचा फतवा काढल्यावरून आरोप निश्‍चित केले आहेत. या दोघांनाही नेदरलँड्सकडे सोपवण्याची मागणी यापूर्वीच नेदरलँड्स सरकारने पाकिस्तानला केली आहे. २ पाकिस्तान्यांपैकी एक ५५ वर्षीय मौलवी (इस्लामचा धार्मिक नेता) आहे आणि दुसरा २९ वर्षीय राजकीय नेता आहे. गीर्ट विल्डर्स हे ‘पार्टी फॉर फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आहेत.

१. गीर्ट विल्डर्स यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावर ही बातमी शेअर केली आहे. गीर्ट  विल्डर्स यांनी लिहिले आहे की, ज्यांनी माझ्याविरुद्ध फतवा काढला, त्यांच्याविरुद्ध आरोप निश्‍चित केले आहेत. त्यांना लवकरच शिक्षा होईल, अशी आशा आहे.

२. नेदरलँड्स आणि पाकिस्तान यांच्यामध्ये आरोपींच्या प्रत्यार्पणाविषयी कोणताही करार नाही. डच प्रॉसिक्युशन सर्व्हिसने पाकिस्तानी अधिकार्‍यांना फौजदारी खटल्यांमध्ये कायदेशीर साहाय्यासाठी विनंती पाठवली आहे.

३. गीर्ट विल्डर्स यापूर्वी म्हणाले होते की, मी माझ्या घोषणापत्रात कुराण, इस्लामशी संबंधित शाळा आणि मशिदी यांवर बंदी घालण्याविषयी बोललो होतो; पण आता असे होणार नाही. आमचे सरकार उदारमतवादी बनण्याचा प्रयत्न करणार आहे. तथापि, आम्ही अजूनही सार्वजनिक ठिकाणी हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि गळा झाकण्याचे वस्त्र) घालण्याच्या विरोधात आहोत.