चक्रवर्ती राजा, अश्वमेध यज्ञ आणि लोकशाही व्यवस्था !
सध्या काही नेत्यांच्या पक्षप्रवेशाविषयी सर्वत्र चर्चा चालू आहे. याच विषयावर सुजित भोगले यांचे ‘पटणारे मत’ याविषयीचा लेख सारांश रूपात येथे देत आहोत.
१. राजेशाही संपून लोकशाही चालू असली, तरी राजनीतीचे नियम तेच !
पूर्वीच्या काळी चक्रवर्ती राजा होण्याचे स्वप्न पहाणारा राज्यकर्ता ‘अश्वमेध यज्ञ’ आयोजित करत असे. त्याचा ‘अश्वमेध’ यज्ञाचा घोडा अडवून, त्या राजाशी लढून त्याला पराभूत करणे’ किंवा ‘त्याचे मांडलिकत्व पत्करणे’, हे दोनच पर्याय अन्य राजांसमोर असायचे. या पद्धतीने तो राजा त्याचे बळ वाढवत नेई आणि मग अशाच एखाद्या मोठ्या चक्रवर्ती राजाला आव्हान देऊन त्याला पराभूत केले जाई अथवा शरण येणार्या राजांना काही विषयांत अभय प्रदान केले जाई. त्यांच्या काही चुका, दोष यांकडे दुर्लक्ष केले जाई; कारण अंतिम हेतू त्यांच्या शक्तीचा वापर करत ‘चक्रवर्ती राजा होणे’ आणि ‘स्वधर्म स्थापना करणे’, हा असे. आता राजेशाही संपून लोकशाही आली असली, तरीही राजनीतीचे नियम पालटलेले नसतात, हे सामान्य लोकांनी समजून घेणे आवश्यक आहे.
२. कुवत नसलेला राजा करत असलेल्या ‘कुरघोडी’ !
सरळ मैदानात लढणारा राजा अश्वमेधाचा घोडा सोडून अन्य राजांना शरण आणतो; परंतु कुवत नसणारा राजा शेजारील राज्ये आतून खिळखिळी करत स्वतःची शक्ती दृढ करतो. स्वतःच्या अराजकाविरुद्ध बंड उभे रहाणार नाही, याची काळजी घेतो.
३. ब्रिटिशांचा मुखवटाधारी प्रतिनिधी (एजंट) : काँग्रेस !
वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील संघर्ष हा कुरघोडीच्या पातळीला पोचलेला आहे. काँग्रेस हा पक्ष किंवा विचार नसून ती एक प्रवृत्ती आहे. काँग्रेस हा ब्रिटिशांचा मुखवटा होता. या मुखवट्यामागून ब्रिटीश राज्य करत होते, तेव्हा आपले सामान्य नागरिक मात्र ‘काँग्रेस ब्रिटिशांशी लढत आहे’, या भ्रमात होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर आणि प्रत्येक क्रांतीकारक यांचे लचके तोडणारी ब्रिटीश राजवट काँग्रेसी नेत्यांच्या प्रति अत्यंत मऊ होती. याचे कारण काँग्रेस ब्रिटिशांचा ‘मुखवटाधारी प्रतिनिधी’ (ब्रिटीश एजंट) होती, हेच होते. काँग्रेसमुळेच वर्ष १८५७ नंतर ब्रिटिशांना या देशात रक्तरंजित संघर्ष करायची वेळ आली नाही. ज्या वेळेस ती परिस्थिती उद्भवत आहे, असे वाटले, त्या वेळी ब्रिटिशांनी काँग्रेसच्या साहाय्याने देशाचे तुकडे केले, तरीही दुसर्या महायुद्धामुळे जर्जर झालेल्या ब्रिटिशांना ‘आझाद हिंद सेना’ आणि ‘नाविक संप’ यांमुळे राज्य करणे अशक्य होऊन बसले, त्या वेळी त्यांनी देश सोडला. देश सोडतांना सुद्धा जितक्या ‘पाचरी’ मारता येतील (हानी करता येईल) तितक्या मारूनच ते इथून गेले.
४. शक्ती आणि अनियंत्रित सत्ता टिकवण्यासाठी देशात फुटीरतावाद पेरणारी काँग्रेस !
काँग्रेसच्या हातात सत्ता आली; पण सतत प्रतिनिधी म्हणून काम केलेला माणूस आस्थापनाचा मालक झाल्यावर ज्या पद्धतीने काम करील, त्या पद्धतीने काँग्रेसने कारभार चालू केला. काँग्रेसला स्वतःची शक्ती आणि अनियंत्रित सत्ता संपत आहे, असा संशय आल्यावर प्रत्येक वेळी ब्रिटिशांच्या पद्धतीने आपल्याच देशात फुटीरतावाद पेरत, पोसत स्वतःची खुर्ची राखण्यात धन्यता मानली. बांगलादेश निर्माण होण्यात काँग्रेसचा वाटा फारसा नसला, तरी त्या वेळी घुसलेली जनता काँग्रेसने देशाबाहेर कधीच काढली नाही; कारण हे जिवंत बाँब काँग्रेसला स्वतःची राजवट स्थिर करायला कायमच हवे होते. जी गोष्ट बांगलादेशी मुसलमानांची तीच नक्षलींची ! काँग्रेसने यांना जाणीवपूर्वक पोसले आहे, दुर्लक्ष करून वाढू दिले आहे, हे भविष्यातील बाँब आहेत. याच पद्धतीने रोहिंग्या घुसवले आहेत. खलिस्तानचे भूत काँग्रेसनेच उभे केले होते.
५. काँग्रेसच्या कृतीला खतपाणी घालणारा आजचा ‘आप’ (आम आदमी पक्ष) !
आज ‘आप’ याच सर्व गोष्टींना खतपाणी घालत आहे. आपल्या देशात या क्षणी, या देशावर आणि हिंदु धर्मावर ‘शून्य’ प्रेम असणारे अन् थोडेफार पैसे मिळाले, तर कत्तल चालू करू शकतील, असे कमीत कमी ७ ते ८ कोटी अवैधपणे घुसलेले शरणार्थी मुसलमान आहेत. आपल्या देशात या क्षणी कमीत कमी १ ते २ लाख आदिवासी नक्षली रक्तपात घडवायला सुसज्ज आहेत. या सर्वांना लागणारे आर्थिक साहाय्य देण्यासाठी चर्च आणि मशिदी सुसज्ज आहेत. अशा दारूच्या कोठारावर बसून आपण ‘लोकशाही’ नावाची ‘बिडी’ फुंकत नैतिकतेचे ज्ञान पाजळत आहोत.
६. काँग्रेसच्या राहुल गांधींच्या यात्रेला विरोध करणे म्हणजे भावनिक आवाहनाची संधी !
राहुल गांधी काढत असलेली यात्रा हे उघड उघड देशाचे तुकडे करण्यास प्रोत्साहन देणारी यात्रा आहे, हे स्पष्ट दिसत आहे. त्यांची पावले, वर्तन तसेच चालू आहे. या सगळ्याचा तुम्हाला राजकीय पद्धतीनेच प्रतिवाद करावा लागणार. राहुल गांधी यांना अटक करणे किंवा यात्रेला प्रतिरोध करणे, म्हणजे त्यांना भावनिक आवाहन करण्याची संधी देणे आहे.
काँग्रेसचा खेळ स्पष्ट आहे. राहुल गांधी परदेशात जाऊन भारताविषयी जे बोलत आहेत, ते त्यांना इथे घडवायचे आहे. उद्या भारतातील रोहिंग्यांनी दंगली पेटवल्या, तर ते रोहिंग्या आहेत कि स्थानिक मुसलमान हे कुणाला आणि कसे कळणार ? यात जीवित हानी झाली की, ‘भारतात हिंदू लोक दंगली करून मुसलमानांचा वंशसंहार करणार आहेत, हे मी म्हणत होतो, तसेच घडत आहे’, असे म्हणून ओरडायला राहुल गांधी मोकळे !
७. सद्यःस्थिती आणि परिणाम
हे सगळे घडू द्यायचे नसेल, तर काय करता येईल ? राहुल गांधींना अटक करा; पण याचा परिणाम त्यांना ‘सहानुभूती मिळणे’ आणि पुढे ते ‘निवडणूक जिंकणे’, असा होऊ शकतो. निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोर यांची हकालपट्टीही करू शकत नाही. त्याचाही विरुद्ध प्रचार होऊ शकतो. या सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अजूनही काँग्रेस पक्षाचा स्वतःचा जनाधार २५ टक्के निश्चित आहे. भाजपचा प्रत्येक विजय हा ३ ते ४ टक्क्यांनी ‘व्होट स्विंग’ने (मत वळवण्यामुळे) झालेला आहे. जर मागच्या दाराने घुसवलेले रोहिंग्या आणि बांगलादेशी मतदार झाले असतील, तर त्यांची अन् अन्य मते मिळून अन् ‘इंडिया’ आघाडी (पंतप्रधान मोदी यांच्या विरोधी पक्षांनी केलेल्या आघाडीचे नाव) मजबूत झाली, तर हा ‘स्विंग’ उलट फिरवणे अशक्य नाही.
८. यावर पर्याय म्हणून शिल्लक असलेला एकच मार्ग
मग या सगळ्यात एकच मार्ग शिल्लक उरतो आणि तो म्हणजे उदारमतवादी हिंदू अन् जनाधार असणारे काँग्रेसी नेते फोडून त्यांना आपल्या पक्षात घेणे. ते भ्रष्ट असतील का ? निश्चित असतील. काँग्रेसमध्ये कोरडा व्यक्ती मोठा होऊच शकत नाही. त्याने पैसे खाल्लेच पाहिजेत आणि त्याचा हिस्सा वर (पक्षश्रेष्ठींना) दिलाच पाहिजे; पण ते जर आपल्याकडे ओढले, तर काय लाभ होईल ? देशभर स्थानिक पातळीवर काही कांड करण्याचे स्वप्न काँग्रेस बघत असेल आणि जर ते या नेत्यांच्या माध्यमातून करणार असेल, तर हे नेतेच आपल्याकडे आले असल्यास कोणतेही षड्यंत्र यशस्वी होण्यासाठी लागणारा स्रोत मिळणार नाही. सध्या केली जाणारी ‘इनकमिंग’ (हिंदु म्हणणार्या पक्षात प्रवेश देणे) केवळ न केवळ यासाठी चालू आहे.
९. … आणि यावर शंका घेऊ नका !
जो माणूस ‘काश्मीर मुक्त’ करतो, रामलल्लाचे (प्रभु श्रीरामाचे बालक रूप) मंदिर उभारतो, मदिनेत हिंदु स्त्री सन्मानाने फिरू शकेल, अशी परिस्थिती निर्माण करतो, अरबी राष्ट्र्रात हिंदु मंदिरे उभी करतो, त्याच्यावर शंका घेऊ नका. फुकाची नैतिकता तुम्हाला उध्वस्त करते. परिस्थितीनुरूप आपल्याला लवचिक व्हावे लागते. श्रीकृष्ण सुद्धा वेळ आल्यावर त्याची नीती वापरतो, ती समजून घ्या !
– सुजित भोगले
(साभार : फेसबुक)
हिंदु राष्ट्राचा अश्वमेध यशस्वी होण्यासाठी !ब्रिटीश प्रतिनिधी असलेल्या काँग्रेसला संपवायचे असेल, तर शरण येणार्या प्रत्येक राजाला आपल्याला त्याच्या गुणदोषांसहित स्वीकारावे लागणार आहे, याला पर्याय नाही. घराणेशाही असलेले गावठी सोरोस (राहुल गांधी) (सोरोस म्हणजे भारतविरोधी षड्यंत्र आखण्यात आघाडीवर असलेले आंतरराष्ट्रीय उद्योगपती जॉर्ज सोरोस) प्रत्येक राज्यात आहेत. केंद्रातील सोरोस राजमाता (काँग्रेसच्या सोनिया गांधी) आहे आणि वरून यांच्या जोडीला पैसे ओतणारा आंतरराष्ट्रीय सोरोस तर आहेच आहे. – सुजित भोगले |
लक्षात घ्या… !देशविरोधी लोकांनी ओतलेल्या पैशांच्या बळावर या देशात काहीही कांड घडवता येऊ शकते, हे लक्षात घ्या.. अ. आपला संपूर्ण ‘मिडिया’ (प्रसिद्धीमाध्यमे) त्यांचा बटिक आहे. हाच ‘मिडिया’ कोणतीही बातमी आणि कोणतेही ‘नॅरेटिव्ह’ (खोटी कथानके) क्षणात देशभर पसरवू शकतो. आ. या प्रत्येकाला वेसण घालणारे कायदे आपल्याकडे अस्तित्वात नाहीत. त्यामुळे या तडजोडी अपरिहार्य आहेत. इ. आज असे अनेक नेते भ्रष्ट असतील; पण ते राष्ट्रद्रोही नाहीत आणि आपापल्या ‘सोरोस’चे ऐकून ते कांड घडवणार नाहीत. किंबहुना ते कांड घडवण्यात रस बाळगून नाहीत, याची निश्चिती करून त्यांना घेतले जात आहे. – सुजित भोगले |