घरात आग लागल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने स्थिर रहाता येऊन उपाययोजना करता येणे आणि भक्तीसत्संगामुळे पंचतत्त्वांप्रती कृतज्ञता वाटणे
१. घरातील मांडणीच्या बाजूला आग लागून मांडणीवरील अन्य साहित्य जळणे; मात्र सनातनचे ग्रंथ आणि सेवेचे साहित्य सुरक्षित रहाणे
‘५.११.२०२१ या दिवाळी पाडव्याच्या दिवशी मी घरातील बैठक कक्षात (हॉलमध्ये) काम करत होते. त्या वेळी सज्जातील दिव्यांच्या माळेजवळ ‘शॉर्टसर्किट’मुळे आग लागली. आम्ही या घरात रहायला येऊन १५ दिवसच झाले होते. त्यामुळे आमचे बरेचसे साहित्य जागेवर ठेवायचे राहिले होते. आम्ही काही साहित्य सज्जात एका बाजूला मांडणीत (रॅकमध्ये) ठेवले होते. मांडणीच्या बाजूलाच आग लागून त्यावरील काही साहित्य जळाले. त्याच मांडणीत मध्यभागी सनातनचे काही ग्रंथ, दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ ठेवलेली पिशवी, माझे सेवेचे साहित्य, माझी व्यष्टी लिखाणाची वही, असे ठेवले होते. त्याच्या आजूबाजूचे सर्व साहित्य आगीत जळून गेले; मात्र ग्रंथ, ‘सनातन प्रभात’ नियतकालिके आणि सेवेचे साहित्य सुरक्षित राहिले.
२. भक्तीसत्संगातील पंचतत्त्वांविषयी झालेल्या सूत्रांचे स्मरण होऊन परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना होणे
त्या वेळी माझे यजमान घरी नव्हते. माझ्या मुलाने (कु. शरण (वय १० वर्षे) याने) न घाबरता प्रसंगावधान राखून पाण्याची बालदी भरून दिली. तो ‘घराच्या बाहेर जाऊन वाळू मिळते का ?’, हे पाहून आला. आग विझवतांना मला घरातील मधल्या कक्षात अग्निदेवतेचे अस्तित्व अनुभवता येत होते. त्या वेळी मला भक्तीसत्संगात सांगितलेल्या ‘पंचतत्त्वांप्रती कृतज्ञताभाव ठेवूया’, या सूत्राचे स्मरण झाले. मला सूक्ष्मातून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा सत्संगातील आवाज ऐकू येत होता. माझ्याकडून प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) ‘या प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती द्या’, अशी सातत्याने प्रार्थना होऊ लागली.
३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे रक्षण केल्याची जाणीव होऊन त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त होणे
‘शॉर्टसर्किट’मुळे घरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. घराच्या सज्ज्यात पुष्कळ पाणी साचले होते. या संपूर्ण प्रसंगात आम्ही शांत अन् स्थिर होतो. प.पू. गुरुदेवांच्या कृपेनेच घरात अन्यत्र आग पसरली नाही. प.पू. गुरुदेवांनीच आमचे रक्षण केले. जे साहित्य जळाले, त्यातील बरेचसे अनावश्यकही होते. यातून ‘देवानेच आमची आसक्ती न्यून केली’, असे मला वाटले.
४. कृतज्ञता
देवानेच आम्हाला या प्रसंगाला सामोरे जाण्याची शक्ती दिली. ‘प.पू. गुरुदेव समवेत आहेत. पंचतत्त्वे साहाय्य करत आहेत’, हे आम्हाला अनुभवता आले. मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
पंचतत्त्वे आहेत जीवनी ।
करण्या सुसह्य सर्व ।। १ ।।
एकमेकांच्या साहाय्यास धावून आली ।
केली आसक्ती न्यून ।। २ ।।
कृतज्ञता मनी उरली ।
अशी गुरुकृपा अनुभवली ।। ३ ।।’
– सौ. नम्रता अतुल कोळसकर, पुणे (१३.१२.२०२१)
|