विरोधकांचे विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन !
मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ फेब्रुवारी या दिवशी शेतकर्यांच्या प्रश्नांवरून विरोधकांनी सरकारच्या विरोधात विधानभवनाच्या पायर्यांवर आंदोलन केले. ‘कापसाला प्रति क्विंटल १४ सहस्र रुपयांचा भाव मिळालाच पाहिजे’, अशी मागणी विरोधकांनी केली. या वेळी विरोधी पक्षांच्या आमदारांनी गळ्यात कापसापासून बनवलेली माळ घातली होती.
सौजन्य: लोकशाही मराठी न्यूज
विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह अनेक विरोधी आमदारांनी या वेळी हातात कापसाची माळ आणि गाजर घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात जातांना विरोधकांच्या हातातील फलकांचे अवलोकन करत त्यांच्या आंदोलनाची नोंद घेतली.