काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी मुंबईच्या प्रश्नावरून मांडलेल्या सूत्रांवर भाजपच्या सदस्यांचा आक्षेप !

पंतप्रधानांवरील टीकेमुळे भाजपचे आमदार संतप्त विधानसभेत गोंधळाचे वातावरण

आमदार वर्षा गायकवाड

मुंबई, २८ फेब्रुवारी (वार्ता.) – ‘गेल्या दीड वर्षात मुंबईने केवळ ‘मित्र काळ’ पाहिला आहे. या काळात केवळ मित्रासाठी निविदा काढण्यात आल्या. मुंबई अक्षरशः विक्रीस काढण्यात आली असून ही लोकशाहीची हत्या आहे. मुंबईचा पैसा हा करदात्या नागरिकांचा असून तो त्यांच्यासाठीच खर्च झाला पाहिजे’, अशी मागणी काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड यांनी केली. अर्थसंकल्पीय अधिवेशनात २८ फेब्रुवारी या दिवशी विधानसभेत सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनी नियम २९३ अन्वये मुंबईचे प्रश्न आणि विकास यांच्या मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेच्या वेळी त्या बोलत होत्या.

आमदार वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, ‘‘अर्थसंकल्पात सत्ताधारी पक्षांचे आमदार आणि काही माजी नगरसेवक यांच्यासाठी १ सहस्र कोटी रुपये बाजूस ठेवले आहेत. ‘डीप क्लिनिंग योजने’मुळे ७५ कामगारांवर बेकारीची कुर्‍हाड कोसळणार आहे. शिक्षणाचा जो नवा कायदा केला आहे, त्याचा पुनर्विचार करावा.’’ या वेळी आमदार गायकवाड यांनी पंतप्रधानांसह विविध विकास कामांवर हरकतींची सूत्रे उपस्थित केली. त्यामुळे त्यावर भाजपच्या सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. या वेळी सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

भाजपचे सदस्य आशिष शेलार, नीतेश राणे, अमित साटम आणि योगेश सागर यांनी ‘आमदार वर्षा गायकवाड यांच्या भाषणातील आक्षेपार्ह विधाने काढावीत’, अशी मागणी केली. यावर पिठासीन अधिकारी दीपक चव्हाण यांनी ‘आमदार गायकवाड यांच्या भाषणात जर काही आक्षेपार्ह वक्तव्य आढळले, तर पडताळून ते काढून टाकीन’, असे निर्देश दिले.