प्रत्येक परिस्थिती ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारल्यास मनोलय होऊन आपली देवाच्या दिशेने वाटचाल होणे
१. उत्तरदायी साधकाने एका सूत्राविषयी दिलेला निर्णय स्वीकारता न आल्याने मनाचा संघर्ष होणे आणि त्याला संदेश पाठवणे
‘१४.६.२०२३ या दिवशी मी सेवा करत असतांना उत्तरदायी साधकाने मला एका सूत्राविषयी दिलेला निर्णय अयोग्य वाटला. त्यामुळे माझ्या मनाचा संघर्ष होऊ लागला. मी सहसाधकाला सांगितले, ‘‘उत्तरदायी साधकाने दिलेला हा निर्णय ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारूया’’ आणि तसे मी स्वतःच्या मनालाही समजावले; पण मला ते पूर्णपणे स्वीकारता आले नाही. उत्तरदायी साधकाने सांगितलेल्या निर्णयानुसार मी कृती केली असली, तरीही माझ्या मनात ‘त्यांचा निर्णय अयोग्य आहे’, असा विचार सतत येत होता. त्यामुळे मी उत्तरदायी साधकाला त्याविषयी ‘व्हॉट्स ॲप’वर संदेश पाठवला.
२. संतांच्या समवेत नामजप करतांना प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधून नामजप केल्यावर त्रासांत वाढ होणे
त्यानंतर मी संतांच्या समवेत नामजप करायला बसलो. मी नामजप करायला बसताक्षणीच मला पुष्कळ अस्वस्थ वाटू लागले. ‘माझ्यावर पुष्कळ त्रासदायक आवरण आले आहे’, असे मला जाणवले. मी माझ्या शरिरावर आलेले आवरण काढले आणि त्यानंतर मी प्राणशक्तीवहन पद्धतीनुसार नामजप शोधला. मी ‘शून्य’ हा नामजप चालू केल्यावर मला प्रचंड त्रास होऊ लागला. माझी अस्वस्थता आणखी वाढली. माझ्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले आणि पुष्कळ जांभया येऊ लागल्या.
३. सलग १५ मिनिटे नामजप केल्यावर मनात प्रसंग सोडून देण्याचा विचार येणे आणि उत्तरदायी साधकाला पाठवलेला संदेश पुसणे अन् असे केल्यावर हलकेपणा जाणवणे आणि आनंद वाटणे
मी सलग १५ मिनिटे ‘शून्य’ हा नामजप केला. तेव्हा अकस्मात् माझ्या मनात विचार आला, ‘दायित्व साधकाने दिलेल्या निर्णयानुसार कृती झाली आहे. आता हा विषय सोडून दे.’ मी भ्रमणभाष काढून लगेचच ‘व्हॉट्स ॲप’वरील संदेश पुसून टाकला.
तेव्हा मला हलकेपणा जाणवला आणि आतून आनंदी वाटू लागले. ‘माझ्यावरचे त्रासदायक आवरण पूर्णपणे गेले आहे आणि त्रास न्यून झाला आहे’, असे मला जाणवले.
४. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या प्रसंगाविषयी सांगणे आणि त्यांनी ‘मनाची अस्वस्थता वाढवणारा विचार सोडून दिल्यास मनोलय होऊन ईश्वराशी अनुसंधान साधता येते’, असे सांगणे
मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याशी या प्रसंगाविषयी बोललो. तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘आपले मनच आपला सर्वांत मोठा शत्रू असते. मनाची अस्वस्थता वाढवणारा एक विचार आपण सोडून दिला, म्हणजे त्या विचाराचा आपण त्याग केला की, आपला एकप्रकारे मनोलयच होतो. मनोलय झाल्याने आपल्याला होणारा आध्यात्मिक त्रास लगेच न्यून होतो आणि आपल्याला ईश्वराशी अनुसंधान साधता येते.’’
५. शिकायला मिळालेले सूत्र
या प्रसंगातून मला शिकायला मिळाले, ‘योग्य-अयोग्य यांमध्ये अडकून न रहाता समोर आलेली प्रत्येक परिस्थिती ईश्वरेच्छा म्हणून स्वीकारायची. आपल्या मनाचा संघर्ष होणार्या विचारांचा आपण त्याग केल्यास आपला मनोलय होतो आणि आपण देवाच्या दिशेने जातो.’
– आधुनिक वैद्य उज्ज्वल कापडिया, फोंडा, गोवा. (३०.६.२०२३)
|