रत्नागिरी येथील कु. वैदेही गजानन खडसे हिला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
१. आरंभी साधना न करणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी वडिलांच्या माध्यमातून साधना करायला प्रवृत्त करणे
‘आरंभी मी साधना करत नसल्याने मला ‘आध्यात्मिक स्तरावरील उपाय आणि व्यष्टी साधना करू नये’, असे वाटायचे. केवळ माझे बाबा सांगतात; म्हणून मी नामजप करायचे. वर्ष २०२१ मध्ये दळणवळण बंदीच्या काळात एके दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांचे साधकांच्या मुलांसाठी ‘ऑनलाईन’ मार्गदर्शन होते. तेव्हा बाबांनी माझे नाव त्या मार्गदर्शनासाठी दिले. मला हे कळल्यावर मला बाबांचा पुष्कळ राग आला आणि मी त्यांना म्हणाले, ‘‘मला हे मार्गदर्शन ऐकायचे नाही.’’ त्यावर ते मला म्हणाले, ‘‘मी भ्रमणभाषवर लावून ठेवतो. तू केवळ ऐक.’’ त्यांनी भ्रमणभाषवर मार्गदर्शन लावले. तेव्हा ‘बाबा सांगत आहेत, तर ऐकूया’, असा विचार करून मी ते ऐकले. तेव्हा मला त्यातून पुष्कळ आनंद मिळाला. मला खर्या अर्थाने साधना म्हणजे काय ? हे समजले. त्यानंतर मी साधनेच्या संदर्भात इतर साधकांचीही प्रवचने ऐकली. त्यानंतर मी सेवेतही सहभागी झाले. ‘अशा प्रकारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी बाबांच्या माध्यमातून मला साधनेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करवून घेतले’, हे मला जाणवले.
२. आश्रमात सतत विचारून सेवा केल्याने ‘विचारून घेणे’ हा गुण वाढणे
‘काही दिवसांनी मी रामनाथी आश्रमात स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रियेसाठी आले. तेव्हा मला सतत विचारून घेऊन सेवा करावी लागायची. त्या वेळी माझ्या मनात सारखा विचार यायचा, ‘सतत विचारून सेवा का करायची ?’; पण ‘मी सतत विचारून सेवा केल्याने देवाच्या कृपेने माझ्यात विचारण्याची वृत्ती वाढत आहे आणि सेवेतील चुकांचे प्रमाण अल्प होत आहे’, हे माझ्या लक्षात आले. माझ्यात विचारून सेवा करण्याचा गुण वाढला. यावरून भगवंत ‘प्रत्येक प्रसंगातून आपले स्वभावदोष तर घालवतोच; पण त्याच बरोबर आपल्यातील गुणसुद्धा वाढवतो’, हे लक्षात आले.
३. स्वयंपाकघरात ताक करतांना भाव ठेवल्यामुळे बालसाधिकेच्या माध्यमातून बाळकृष्णाने येऊन ताक पिणे
मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने पू. रेखाताईंनी (सनातनच्या ६० व्या संत पू. रेखा काणकोणकर यांनी) आंबील बनवण्याची सेवा दिली. एक दिवस मी आंबील करण्यासाठी ताक करत असतांना ‘बाळकृष्णच माझ्या समोर बसला आहे’, असा मी भाव ठेवला. त्या वेळी ‘खरोखरच बाळगोपाळ माझ्या समोर बसला आहे आणि ‘तू माझ्यासाठी ताक करतेस ना ! मग मला थोडं ताक दे ना !’ असे म्हणत आहे’, असे मला वाटले. थोड्या वेळाने २ – ३ वर्षांची एक बालसाधिका आली आणि ती मला म्हणाली, ‘‘ताई, मला थोडे ताक देऊ शकतेस का गं ?’’ ‘त्या बालसाधिकेच्या माध्यमातून बाळकृष्णच माझ्याजवळ येऊन त्याने ताक मागून घेतले’, असे मला वाटले. ताक पिऊन झाल्यावर ती बालसाधिका निघून गेली; पण ‘तिच्या माध्यमातून मला भेटण्यासाठी माझा कृष्णच आला’, असे वाटून मला पुष्कळ आनंद झाला.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर देवतांची चित्रे दिसणे
पूर्वी एकदा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाला बसायची संधी मिळाली. तेव्हा माझी दृष्टी केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांवर होती. त्या वेळी त्यांच्या डाव्या चरणाकडे पहातांना ‘लक्ष्मण धनुष्यबाण घेऊन उभा आहे’, असे चित्र मला दिसत होते. जणू काही ‘तो त्यांचे रक्षण करण्यासाठीच तिथे उभा आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या उजव्या पायाच्या चरणावर मला मोरपिसाचे चित्र उमटलेले दिसले. अशा प्रकारे त्यांच्या चरणांवर श्रीराम आणि श्रीकृष्ण या दोन्ही देवांची चित्रे मला अनुभवायला मिळाली.’
– कु. वैदेही गजानन खडसे (आताचे वय २३ वर्षे), रत्नागिरी
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |