अफगाणिस्तान पाकच्या बंदराऐवजी इराणमधील बंदरांतून करू लागला व्यापार !
|
काबुल (अफगाणिस्तान) – भारताने इराणमध्ये बांधलेल्या ‘चाबहार’ आणि इराणचा ‘बंदर अब्बास’ या बंदरांचा वापर करून अफगाणिस्तानमधील तालिबान सरकार जगात आयात आणि निर्यात करत आहे. यामुळे पाकिस्तानचा व्यापार ७० टक्क्यांनी घटला आहे. अफगाणिस्तान आयात आणि निर्यात यांसाठी पाकवर अवलंबून होता. पाकच्या कराची बंदरातून अफगाणिस्तान आयात-निर्यात करत होता. पाकिस्तान अफगाणिस्तानवर ‘तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान’ या पाकमध्ये कारवाया करणार्या संघटनेवर कारवाई करण्यासाठी दबाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होता. यासाठी पाकने त्याच्या देशातील लाखो शरणार्थी अफगाणींची हकालपट्टीही करत आहे. हा दबाव झुगारण्यासाठी तालिबान सरकारने इराणचा मार्ग निवडला आहे. या निर्णयामुळे पाकिस्तानच्या २० सहस्र लोकांच्या नोकर्या जाण्याची स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
१. पाकिस्तान सरकारने गेल्या वर्षी अफगाणिस्तानातून होणार्या आयातीवर अनेक निर्बंध लादले होते आणि अफगाणी व्यावसायिकांकडून बँक गॅरंटीची मागणी करण्यास आरंभ केला होता. त्यामुळे तालिबानला व्यवसाय करतांना अडचणी येऊ लागल्या. याला सामोरे जाण्यासाठी तालिबानने भारत, इराण आणि ताजिकिस्तान यांचे साहाय्य घेतले. त्यानंतर चाबहार मार्गे व्यापार चालू झाला. तालिबानच्या या पावलामुळे पाकिस्तानची चाल फोल ठरली आहे.
२. तालिबानचा नेता मुल्ला अब्दुल गनी बरादर याने इराणला व्यापारासाठी चाबहार बंदराचा वापर करण्यास अनुमती देण्याचे आवाहन केले होते. तालिबानला केवळ कमी कर भरावा लागत नाही, तर वेळेचीही बचत होत आहे. चाबहार बंदराच्या साहाय्याने अफगाणिस्तान आता युरोप, आखाती देश, भारत आणि चीन यांच्याशी जोडला गेला आहे. कराची बंदरापेक्षा चाबहार आणि ‘बंदर अब्बास’ हे अफगाणिस्तानच्या जवळ आहेत. चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली असून ते अफगाणिस्तानमार्गे भारताला मध्य आशियाशी जोडते.