नागरी बँकांच्या धर्तीवर पतसंस्थांना ऊर्जितावस्था द्यावी ! – प्रवीण दरेकर, भाजप आमदार

प्रवीण दरेकर

मुंबई – नागरी बँका सध्या अडचणीत आहेत. ५० टक्के नागरी सहकारी बँका बंद पडतील, अशी स्थिती आहे. नागरी सहकारी बँकांची स्थिती वाईट आहे. नागरी बँकांच्या धर्तीवर पतसंस्थांना ऊर्जितावस्था द्यावी. या बँकांना काही कोटी रुपयांचा ‘बॅकॲप’ लागतो. सरकारने तो द्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात केली. पुरवणी मागण्यांच्या चर्चेच्या वेळी ते बोलत होते.

दरेकर पुढे म्हणाले की, मुंबईतील स्वच्छता कर्मचार्‍यांना केवळ ६ सहस्र रुपये मिळतात. जागतिक निविदा (‘ग्लोबल टेंडर’) काढल्यामुळे ७५ सहस्र स्वच्छता कर्मचार्‍यांवर बेकारीची कुर्‍हाड येऊ शकते. हे ‘ग्लोबल टेंडर’ रहित करावे. या प्रश्नाकडे उद्योगमंत्री सामंत यांनी लक्ष घालावे.

वनभूमीवर रहाणार्‍यांना नागरी सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे. गरीब लोक रहात आहेत. त्यांना विजेची जोडणी नाही. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील बंधारे अर्धवट अवस्थेत आहेत, ते पूर्ण करावेत, अशी मागणी दरेकर यांनी या वेळी केली.