चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या हत्याकांडाची धमकी दिल्याविषयी सांगली पोलीस ठाण्यात तक्रार !

पुणे येथे ही गुन्हा नोंद !

सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार देतांना विविध ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते

सांगली – ‘गावरान विश्लेषक’ या वाहिनीवर मराठा आरक्षण आंदोलनातील काही व्यक्तींच्या प्रतिक्रिया घेतल्या जात होत्या. त्यात एका अज्ञात व्यक्तीने ‘संपूर्ण ब्राह्मण समाजाला ३ मिनिटांत संपवू’, अशी धमकी दिली आहे. त्याच समवेत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही एकेरी उल्लेख केला आहे. तरी चिथावणीखोर वक्तव्य करून महाराष्ट्रातील ब्राह्मण समाजाच्या हत्याकांडाची धमकी दिल्याविषयी ‘संबंधित व्यक्तीवर तात्काळ योग्य ती कारवाई केली जावी’, या मागणीसाठी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.

या वेळी ब्राह्मण सभेचे अध्यक्ष केदार खाडिलकर, ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष मंगेश ठाणेदार, ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष किशोर पटवर्धन, कार्यवाह श्रीराम वेलणकर, उद्योजक रवी भिडे, संदीप सोले, डॉ. भालचंद्र साठे, सुनील कुलकर्णी, संजय रूपलग, विजय भिडे यांच्यासह ब्राह्मण समाजातील अनेक समाजबांधव उपस्थित होते. पोलिसांनी यावर कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.

पुणे येथे परशुराम सेवा संघाच्या तक्रारीनंतर गुन्हा नोंद !

पुणे – याच प्रकरणी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे आणि त्यांचे सहकारी यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर भारतीय दंड विधान १५३ आणि ५०६ या कलमांनुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.