प्रशासन काय करते ?
काही दिवसांपूर्वी आळंदी (जिल्हा पुणे) येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी जाण्याचा योग मला आला. अत्यंत चैतन्यदायी असणार्या या तीर्थक्षेत्री जगभरातून प्रतिवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. आळंदी येथे जात असतांनाच काही किलोमीटर अंतरापासून आपोआपच चांगले वाटू लागले, मनातील विचार न्यून झाले. ‘मन शांत होऊन प्रसन्न होत आहे’, असे मला जाणवत होते. जसजसे मंदिर जवळ येत होते, तसतसे अजूनच चांगले वाटत होते. मनाला जाणवणारा हा परिणाम कोणत्याही बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही, हेही लक्षात येत होते; कारण आळंदी गाव हे पुष्कळ मोठे किंवा प्रशस्त असे नाही. त्यामुळे मनाच्या या स्थितीविषयी आपोआपच आतून कृतज्ञता व्यक्त होत होती.
हिंदु धर्म, देवता आणि संत यांची महानता आपोआपच मनामध्ये अधोरेखित झाली. मंदिरामध्ये गेल्यानंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची पुष्कळ गर्दी होती. मंदिरामध्ये लहानांपासून वयाने मोठे असणारे वारकरीही टाळ आणि मृदुंग घेऊन कीर्तन करत होते. त्यांचे कीर्तन ऐकतांना मन भारावून जात होते. असे वाटत होते की, कीर्तन संपूच नये. लहान मुलांची कीर्तन करतांनाची तल्लीनता पहातांना आपणही त्या कीर्तनामध्ये कधी रंगून जातो, हेच समजत नाही. तेथील सर्व वातावरण पाहून असे वाटते, ‘काळ येथेच थांबावा आणि या कीर्तनामध्ये रंगून जावे. अजून काहीच नको.’ संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेऊन ७२७ वर्षे झाली; परंतु त्यांनी लिहिलेले अभंग आजही कीर्तनाच्या माध्यमातून सर्वजण ज्ञानेश्वर माऊलींना अनुभवत आहेत. त्यांनी आळंदी येथे चैतन्याचा ठेवा पुष्कळ मोठ्या प्रमाणात ठेवला आहे. हे मंदिर पवित्र इंद्रायणी नदीच्या काठी आहे. येथे लाखो वारकरी कुणीही न बोलावता ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी येतात.
असे असले, तरी पवित्र इंद्रायणी नदी ही अतिशय प्रदूषित झालेली आहे. तिच्या किनारी आपण उभेही राहू शकत नाही, एवढी दुर्गंधी येते. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे ‘नदीचे पावित्र्य टिकवून ठेवावे’, असे सामान्यांनाही वाटत नाही आणि प्रशासनालाही वाटत नाही, हे दुर्दैवी आहे; परंतु भाविक या नदीमध्ये इंद्रायणी देवतेला अनुभवण्याचा प्रयत्न करतात. मंदिरामध्ये आलेले कुणीही नदीकडे न येता जात नाहीत. काही जण अशाही स्थितीत नदीची पूजा करतात. भाविकांचा भाव असल्यामुळे त्यांना दुर्गंधी जाणवत नाही; परंतु प्रशासनाचे काय ?
जनतेकडून कर वसूल केला जातो; परंतु तशा सुविधा दिल्या जात नाहीत. येथील सर्व स्थिती पाहून वाटते की, संतांनी चैतन्यरूपी ठेवा दिला; परंतु तो टिकवून ठेवण्यासाठी प्रशासन अपयशी ठरत आहे, हे नक्की !
– वैद्या ((कु.) सुश्री) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.