धर्म
१. व्याख्या
अ. यतोऽभ्युदयनिः श्रेयससिद्धिः स धर्मः।
अर्थ : जो इहलोकीचे कल्याण आणि मोक्ष मिळवून देतो तो धर्म.
आ. यद् भूतहितमत्यन्तम् एतत् सत्यं मतं मम । – महाभारत
अर्थ : जे भूतमात्रांच्या हिताचे आहे ते सत्य.
खरा धर्म कळणे महत्त्वाचे !
एकदा एका माणसाच्या मागे चोर लागले. तो पळत पळत गेला आणि भीतीने एका झाडाच्या आड दडला. ते एकाने पाहिले. मागाहून चोर आले. त्यांनी त्या व्यक्तीला विचारले, ‘‘आता धावत आलेला माणूस कुठे आहे ?’’ त्या व्यक्तीने सत्य बोलण्याचे व्रत घेतले होते. त्याने तो माणूस चोराला दाखवला. त्या चोरांनी त्या माणसाला ओढत आणले आणि त्या व्यक्तीच्या देखत ठार मारले. त्या हत्येचे पाप त्या व्यक्तीला लागले. श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘या व्यक्तीला खरा धर्म कळला नव्हता; म्हणून त्याने सत्य बोलून त्या निरपराध माणसाला त्या चोरांकडे दिले.’’ आपल्या सत्य बोलण्यामुळे जर प्राणिमात्रांचे अकल्याण होत असेल, तर ते सत्य बोलणे, म्हणजे अधर्म आहे.
श्रीकृष्णाने सांगितलेले तत्त्व अंगी बाणल्यामुळे हिंदु धर्म जगात टिकून असणे
श्रेयान्स्वधर्मो विगुणः परधर्मात्स्वनुुुष्ठितात् ।
स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः ॥
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय ३, श्लोक ३५
अर्थ : आचरण्यास सोप्या अशा परधर्मापेक्षा सदोष असला तरीही स्वधर्मच श्रेष्ठ होय. स्वधर्मात राहून मरण आले तरी श्रेयस्कर. (कारण) परधर्माचा स्वीकार करण्यात मोठे भय आहे.
हे तत्त्व अंगी बाणल्यामुळे आज आपला धर्म टिकून आहे. जगातील इतर पुरातन धर्म मात्र नष्ट झाले.