पिंपरी (पुणे) येथे भारतीय चलनातील ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त !
६ जणांना अटक; ७ दिवसांची पोलीस कोठडी
पिंपरी – चीनमधून ऑनलाईन माध्यमाद्वारे कागद मागवून त्यावर भारतीय चलनातील बनावट नोटा छापण्यात आल्या आहेत. पुणे येथील अप्पा बळवंत चौकातून छपाईसाठी जुने ऑफसेट यंत्र आणून दिघी येथील मॅगझिन चौकात बनावट नोटा छापण्याचा उद्योग चालू करण्यात आला होता. पोलिसांनी यातील प्रमुख ६ जणांना अटक केली. त्यांच्याकडून ७० सहस्र रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या सर्वांना ७ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
ऋतिक चंद्रमणी खडसे, सूरज यादव, आकाश धंगेकर, सुयोग साळुंखे, तेजस बल्लाळ, प्रणव सुनील गव्हाणे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
१. ‘नोटांचे डिझाइन करता येत असल्याने चलनी नोटा छापल्यास लाभ होईल’, अशी कल्पना सूरजला सुचली. त्यानुसार त्याने चीन येथून ऑनलाइन माध्यमाद्वारे तेजस बल्लाळ याच्या पत्त्यावर कागद मागवला. त्यांनी पहिल्या टप्प्यात ७० सहस्र रुपये किमतीच्या ५०० रुपयांच्या चलनी नोटांची छपाई केली.
२. या नोटा देण्यासाठी एका व्यक्तीशी संपर्क साधला. एक लाख रुपयांच्या बनावट नोटांच्या बदल्यात ४० सहस्र रुपये देण्याचे ठरले. त्यानुसार ऋतिक ७० सहस्र रुपये किमतीच्या बनावट नोटा घेऊन आला होता. काही मासांपूर्वी याच आशयाची वेबसीरिजही आरोपींनी पाहिली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकाभारताची अर्थव्यवस्था खिळखिळी करू पहाणार्यांना आजन्म कारावासात डांबण्याची शिक्षा द्यायला हवी ! |